Join us  

विराट कोहली कसोटीच्या मैदानात खेळतो 'बुद्धिबळ', प्रतिस्पर्धी होतो 'चेकमेट'

चौसष्ट घरांवर अधिराज्य गाजवणारा जगजेता मॅग्सन कार्लसन जेव्हा पटावर बसतो तेव्हा त्याचा आक्रमक खेळ हेच त्याचे शस्त्र असते. हेच शस्त्र विराट कोहली कसोटीच्या मैदानात वापरताना दिसतो आहे. एरवी टी-20 आणि वनडे सामन्यांमध्ये दिसणारी आक्रमकता विराट कोहली आपल्या निर्णयांतून कसोटीतही वापरतो.

By namdeo.kumbhar | Published: August 08, 2017 7:01 AM

Open in App

चौसष्ट घरांवर अधिराज्य गाजवणारा जगजेता मॅग्सन कार्लसन जेव्हा पटावर बसतो तेव्हा त्याचा आक्रमक खेळ हेच त्याचे शस्त्र असते. हेच शस्त्र विराट कोहली कसोटीच्या मैदानात वापरताना दिसतो आहे. एरवी टी-20 आणि वनडे सामन्यांमध्ये दिसणारी आक्रमकता विराट कोहली आपल्या निर्णयांतून कसोटीतही वापरतो. हेच गेल्या दोन वर्षांच्या त्याच्या कसोटी कर्णधारपदाच्या कारकिर्दीत दिसून आले आहे. कर्णधार एम.एस. धोनीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर कर्णधारपदाचा काटेरी मुकुट परिधान केलेल्या विराट कोहलीनं सलग आठ कसोटी मालिका जिंकण्याचा कारनामा केला आहे. विराट कोहलीनं कसोटी संघाचे कर्णधारपद स्विकारले तेव्हापासून त्याला प्रतिस्पर्धी संघाला फॉलो ऑन देण्याची संधी 9 वेळा आली. या सामन्यांमध्ये त्याने प्रतिस्पर्धी संघाना कोणतीही संधी दिली नाही. आतापर्यंत त्यानं फक्त 3 वेळा फॉलऑन दिला आहे. यामध्ये 2 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. तेही खराब हवामानामुळे. आणि 1 सामना जिंकला आहे. विराट कोहलीनं 9 पैकी 6 सामन्यात मोठी आघाडी असतानाही समोरच्या संघाला फॉलो ऑन दिला नाही. या सहाही सामन्यात त्यानं विजय मिळवला आहे. हे विशेष. यामागील कारण स्पष्ट आहे. विराटनं मध्यंतरी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होतं की, कसोटी हा पाच दिवसांचा खेळ आहे. सामना पाचव्या दिवशी जिंकला काय आणि तिसऱ्या दिवशी जिंकला. विजय हा विजय असतो. त्याच्या या शांत स्वभामागेही आक्रमपणाची झलक दिसते. समोरच्या संघाला संधी का द्यायची हाच त्याच्या खेळण्यातील उद्देश दिसतोय.कसोटी क्रिकेटवर वर्चस्व गाजवण्याच्या त्याच्या महत्त्वाकांक्षा अगदी स्पष्ट आहेत. म्हणूनच तो एका सामन्यानंतर पत्रकाराशी बोलताना म्हणाला होता की, शिकण्याचे दिवस आता संपले आहेत. आता कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवण्याची वेळ आहे. कर्णधारपदाची सुत्रे संभाळल्यानंतर त्याच्या आक्रमक आणि स्टाईलीश स्वभावामुळे त्याच्यावर अनेकांनी टीका केली होती. पण हीच आक्रमकता त्याचे शस्त्र असल्याचे अनेकदा त्याच्या फलंदाजीतून आणि निर्णयांतूनही दिसून आले आहे. असं म्हणतात की, आयुष्यातील सर्वात कठीण कालखंडातून जातानाच माणसाची खरी ओळख पटते. तर सर्वात आव्हानात्मक प्रतिस्पध्र्याविरुद्ध खेळतानाच खेळाडूचा दर्जा खऱ्या अर्थाने सिद्ध होतो. याचे उदाहरणच द्यायचे झाल्यास विराट कोहलीचे देता येईल. प्रत्येत अडचणीवर तो मात करत असतो.  महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटला अलविदा केला आणि तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही निवृत्तीच्या उंबरठय़ावर आहे. धोनीच्या या उत्तरार्धाच्या काळात धोनी धावांचे इमले रचणारा फलंदाज म्हणून कधीच प्रकाशात आला नाही. युवराज सिंगचा फॉर्म आता त्याला साथ देत नाही. पूर्वीचा आणि आताचा युवराज यातील जमीन-अस्मानाचे अंतर दिसून येत आहे. सुरेश रैना, शिखर धवन, रोहित शर्मा ही मंडळी अधूनमधून खेळी साकारतात, पण विराटसारखे सातत्य आणि कोणत्याही क्रिकेट प्रकारातील विजयाचा आत्मविश्वास ओघानेच या मंडळींमध्ये जाणवतो.  विराट कोहलीनं ज्याप्रमाणे आपल्या फलंदाजीतल्या तृटी दूर केल्या त्याचप्रमाणे त्यानं कर्णधार झाल्यानंतर आपल्या आक्रमकतेवर अंकुश ठेवल्याचं पाहायला मिळते. तुम्ही जर निरक्षण केलं असेल तर, कर्णधार होण्यापूर्वीचा विराट आणि आजच्या विराटच्या खेळात आणि स्वभावातला फरक तुम्हाला दिसेल. ऑस्ट्रेलियन संघाला कोहली जशास तसा सामोरा गेला हे कौतुकास्पद आहे. सुनिल गावसकर, कपिल देव, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि  एम. एस. धोनी  यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला.  आता कोहली त्याच्या काळात भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर घेऊन जाईल यात काही शंका नाही.