Join us  

विराट कोहलीने युवा खेळाडूंना दिला 'हा' सल्ला

२५ कसोटी शतकांची नोंद करणारा जगातील अव्वल कसोटी फलंदाज कोहलीने युवा खेळाडू पाच दिवसाच्या सामन्यात अपयशी ठरल्यास त्यांना मानसिक अडथळे येऊ शकतात, असा इशारा देखील दिला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 6:44 AM

Open in App

अ‍ॅडलेड: ‘केवळ टी२० वर फोकस करीत राहिल्याने कसोटी खेळताना त्रास होणारच. त्यासाठी कुठलेही कारण न देता घाम गाळण्यास सज्ज रहा,’ असा सल्ला भारताचा कर्णधार विराट कोहली याने युवा खेळाडूंना दिला. २५ कसोटी शतकांची नोंद करणारा जगातील अव्वल कसोटी फलंदाज कोहलीने युवा खेळाडू पाच दिवसाच्या सामन्यात अपयशी ठरल्यास त्यांना मानसिक अडथळे येऊ शकतात, असा इशारा देखील दिला आहे.

तो पुढे म्हणाला, ‘आम्ही लहान प्रकारच्या क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करतो आणि वरून कसोटीमध्ये चांगली कामगिरी होत नसल्याची ओरडही करतो. यामुळे मानसिक त्रास होत राहील. पाच दिवस सकाळी उठून तत्पर राहण्यासाठी मेहनत असावी. दोन तास फलंदाजी करूनही तुमच्याकडून धावा होत नसतील, तर तुमच्या मेहनतीत अनेक उणिवा आहेत, असे मानायला पाहिजे. सध्याचे कसोटीपटू युवा पिढीपुढे आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारत कसोटी क्रिकेटमध्ये युवा शक्ती बनावा, अशी आमची इच्छा आहे.’भारताला भविष्यात कसोटी महाशक्ती बनविणे हा आमचा प्रयत्न असल्याचे सांगून विराट म्हणाला, ‘भारतीय क्रिकेटही कसोटीपटूंचा आदर करते. या प्रकाराचे चाहते जगभर असल्याने कसोटी क्रिकेट नेहमी यशोशिखरावरच राहणार. माझे काम सोपे करण्यासाठी मी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा आभारी आहे.’

‘२०१४ पासून प्रशिक्षक शास्त्री यांनी मला नियमितपणे फिडबॅक दिला आहे. खेळात कधी आणि कुठे सुधारणा करण्याची गरज आहे याबद्दल मार्गदर्शन केले,’ असेही कोहलीने म्हटले. शास्त्री कोहलीच्या सुरात सूर मिळवित असल्याच्या वृत्ताचे कोहलीने पुन्हा खंडन केले. तो म्हणाला, ‘शास्त्री यांनी खेळ जवळून पाहिला आहे. अनेकदा समालोचन केले आहे. खेळ पाहून तो कुठल्या दिशेला चालला आहे, याची त्यांना आधीच कल्पना येते. त्यांच्याकडून फिडबॅक घेण्यात आनंद वाटतो. कर्णधार म्हणून तयार करताना त्यांनी स्वत:च्या गरजेनुसार बदलण्याचा कधीही प्रयत्न केला नाही.’(वृत्तसंस्था)

टॅग्स :विराट कोहली