कोलकाता : भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करताना दुस-या एकदिवसीय सामन्यात विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाचा ५० धावांनी पराभव करुन ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. कुलदीप यादवने घेतलेल्या हॅट्ट्रीकच्या जोरावर भारताने बाजी मारली. प्रथम फलंदाजी करुन २५२ धावा उभारल्यानंतर भारताने आॅसीला ४३.१ षटकात २०२ धावांत गुंडाळले.
ईडन गार्डनवर धावांचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाची सुरुवात अडखळती झाली. हिल्टन कार्टराइट (१) व डेव्हिड वॉर्नर (१) स्वस्तात परतल्याने कांगारुंची २ बाद ९ धावा अशी अवस्था झाली. यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ (५९) व ट्राविस हेड (३९) यांनी डावा सावरला. युझवेंद्र चहलने हेडला बाद करुन ही जोडी फोडल्यानंतर आॅसीला ठराविक अंतराने धक्के बसले. त्यात कुलदीपने ३३व्या षटकात वेड, एगर व कमिन्स यांना बाद करत निर्णायक हॅट्ट्रीक घेऊन कांगारुंची ८ बाद १४८ अशी अवस्था केली. परंतु, एका बाजूने टिकून राहिलेल्या मार्कस स्टोइनिसने ६५ चेंडूत नाबाद ६२ धावा करत संघाच्या आशा कायम राखल्या होत्या. मात्र, पांड्याने कुल्टर-नाइल आणि भुवीने रिचर्डसनला बाद करुन भारताचा विजय निश्चित केला. भुवीने टिच्चून मारा करत ९ धावांत ३, तर कुलदीपने ५४ धावांत ३ बळी घेतले.
>कुलदीपची छाप
या सामन्यात हॅट्ट्रीक घेत अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय म्हणून कुलदीपने छाप पाडली. विशेष म्हणजे गेल्या २७ वर्षांत एकदिवसीय सामन्यात हॅट्ट्रीक घेणारा तो पहिला भारतीय ठरला.
याआधी चेतन शर्मा व कपिलदेव यांनी एकदिवसीय सामन्यात हॅट्ट्रीक घेतली आहे.
भुवीनेही मोलाचे योगदान देताना ६.१ षटकात केवळ ९ धावा देत ३ बळी घेतले.
>फलंदाजी अपयशी
विराट कोहली ३१ व्या एकदिवसीय शतकापासून केवळ आठ धावांनी वंचित राहताच भारताचा डाव ५० षटकांत सर्वबाद २५२ असा मर्यादित राहिला. त्याने १०७ चेंडूत आठ चौकारांसह ९२ धावा
ठोकल्या. कोहलीने अजिंक्य रहाणेसह (५५) दुसºया गड्यासाठी १०२ धावांची भागीदारी केली. या दोघांव्यतिरिक्त इतर फलंदाज छाप पाडण्यात अपयशी ठरले. केदार जाधव (२४), हार्दिक पांड्या (२०) व भुवनेश्वर (२०) यांनी थोडाफार प्रतिकार केला.
>धावफलक
भारत : रहाणे धावबाद ५५, रोहित झे. व गो. कूल्टर नाईल ७, कोहली त्रि.गो. कूल्टर नाईल ९२, मनीष त्रि. गो. एगर ३, केदार झे.मॅक्सवेल गो. कूल्टर नाईल २४, धोनी झे. स्मिथ गो. रिचर्डसन ५, हार्दिक झे. वॉर्नर गो. रिचर्डसन २०, भुवनेश्वर झे. मॅक्सवेल गो. रिचर्डसन २०, कुलदीप झे. वेड गो. कमिन्स ००, बुमराह नाबाद १०, चहल धावबाद १, अवांतर १५, एकूण: ५० षटकांत सर्वबाद २५२ धावा.
गोलंदाजी : कमिन्स ३४-१, कूल्टर नाईल ५१-३, रिचर्डसन ५५-३, स्टोयनिस ४६-०, एगर ५४-१,
हेड ११-०.
आॅस्टेÑलिया : कार्टराइट त्रि. गो. भुवनेश्वर १, वॉर्नर झे. रहाणे गो. भुवनेश्वर १, स्मिथ झे. जडेजा गो. पांड्या ५९, हेड गो. मनिष गो. चहल ३९, मॅक्सवेल यष्टीचीत धोनी गो. चहल १४, स्टोइनिस नाबाद ६२, वेड त्रि. गो. कुलदीप २, एगर पायचीत कुलदीप ०, कमिन्स झे. धोनी गो. कुलदीप ०, कुल्टर - नाइल झे. व गो. हार्दिक ८, रिचर्डसन पायचीत गो. भुवनेश्वर ०. अवांतर - १६. एकूण : ४३.१ षटकात सर्वबाद २०२ धावा. गोलंदाजी : भुवनेश्वर ६.१-२-९-३; बुमराह ७-१-३९-०; हार्दिक १०-०-५६-२; चहल १०-१-३४-२; कुलदीप १०-१-५४-३.