धर्मशाळा - आतापर्यंत अपराजित राहिलेल्या विजय हजारे ट्रॉफी विजेत्या कर्नाटक संघाचे पारडे देवधर चषकाच्या अंतिम फेरीत भारत ब संघाविरोधात जड आहे. कर्नाटकचा संघ या स्पर्धेचा समारोप विजेतेपदाच्या चषकासह करण्यास उत्सुक आहे.
कर्नाटकने या स्पर्धेत भारत ए आणि भारत बी दोन्ही संघांना पराभूत करत अंतिम फेरीत जागा मिळवली. भारत ब संघाने कर्नाटक कडून पराभव पत्करल्यानंतर भारत अ संघाला पराभूत केले होते. अंतिम सामना चांगलाच रंगण्याची शक्यता आहे. सोमवारी दोन्ही संघात झालेल्या सामन्यात कर्नाटकने सहा धावांनी विजय मिळवला होता. भारत ब संघाचा फलंदाज मनोज तिवारी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मागच्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती. तर हनुमा विहारी याने भारत अ कडून खेळताना ७६ चेंडू ९५ धावा केल्या होत्या.उमेश यादव राष्ट्रीय निवडकर्त्यांना प्रभावित करण्याची संधी सोडणार नाही. कारण त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपले स्थान पक्के करायचे आहे. तर कर्नाटकच्या रवि कुमार याने स्पर्धेत शानदार खेळ केला आहे. त्याने ११७ आणि ८५ धावांची खेळी केली.