Join us  

विदर्भाची चिवट फलंदाजी; करुण नायरने झुंजवले, मुंबईने अखेर केले शानदार पुनरागमन

विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरनेही नाबाद अर्धशतक झळकाविले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2024 8:21 AM

Open in App

रोहित नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रणजी चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईने दिलेल्या ५३८ धावांच्या भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाने चिवट खेळ करताना चौथ्या दिवसअखेर ९२ षटकांत ५ बाद २४८ धावा केल्या. करुण नायरने विदर्भाच्या आशा कायम राखताना २२० चेंडूंत ७४ धावा काढताना ३ चौकार मारले; परंतु दिवसातील ३२ चेंडू शिल्लक असताना करुणला बाद करीत मुशीर खानने मुंबईला पूर्ण पकड मिळवून दिली. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरनेही नाबाद अर्धशतक झळकाविले.

विदर्भ संघ विजयापासून अद्याप २९० धावांनी दूर असून, त्यांचे पाच फलंदाज शिल्लक आहेत. गुरुवारी अखेरच्या दिवशी सर्वाधिक आशा कर्णधार वाडकर याच्यावर असतील. वाडकरने ९१ चेंडूंत ६ चौकार व एका षटकारासह नाबाद ५६ धावा केल्या आहेत. विदर्भाच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजीचा दिवसभर सामना करताना जबरदस्त संयम दाखवला. बिनबाद १० धावांवरून बुधवारी  विदर्भाने दिवसभर फलंदाजी करताना मुंबईकरांची परीक्षा घेतली. अथर्व तायडे आणि ध्रुव शोरे यांनी ६४ धावांची सलामी देत विदर्भाला चांगली सुरुवात करून दिली. मुंबईकरांना बळी मिळवणे आवश्यक असताना शम्स मुलानीने संघाला पहिले यश मिळवून दिले. त्याने १९व्या षटकात अथर्वला (३२) पायचीत पकडल्यानंतर २०व्या षटकात तनुष कोटियनने ध्रुवला (२८) त्रिफळाचीत केले. दोन्ही सलामीवीर पाठोपाठ बाद झाल्याने मुंबईने पुनरागमन केले.

मुंबईकर विदर्भाभोवती फास आवळणार असे दिसत असताना अमन मोखाडे आणि करुण नायर यांनी तिसऱ्या गड्यासाठी १६२ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी केली. मुशीर खानने ४७व्या षटकात ही जोडी फोडताना मोखाडेला पायचीत पकडले. त्याने ७८ चेंडूंत २ चौकारांसह ३२ धावांची झुंज दिली. यानंतर लगेच यश राठोडही (७) कोटियनचा शिकार ठरल्याने विदर्भाचा डाव ४ बाद १३३ धावा असा घसरला. करुणने  झुंजार फलंदाजीने सामना समान स्थितीत आणला. त्याला अडचणीत आणण्यासाठी मुंबईकरांनी अनेक प्रयत्न केले; परंतु करुणने संयम ढळू न देता सरळ बॅटने खेळत एकेरी-दुहेरी धावांवर भर दिला. अखेर दिवसातील शेवटच्या सहाव्या षटकात मुशीर खानने करुणचा बहुमूल्य बळी मिळवला.

जल्लोष ढोल-ताशांचा

मुंबई चौथ्याच दिवशी विजय मिळवून विक्रमी ४२व्या जेतेपदाला गवसणी घालणार अशी शक्यता होती. त्यामुळे वानखेडे स्टेडियमवर अखेरच्या सत्रात एमसीए पॅव्हेलियन स्टँडमध्ये ढोल-ताशा पथकानेही हजेरी लावली; परंतु विदर्भाने शानदार झुंज देत सामना पाचव्या दिवसापर्यंत खेचला. करुण नायरचा बळी गेल्यानंतर या पथकाने जल्लोषात वादन करीत प्रेक्षकांमध्ये जल्लोष निर्माण केला.

मुंबईचा ‘रोनाल्डो’

विदर्भाकडून तिसऱ्या बळीसाठी अर्धशतकीय भागीदारी झाल्यानंतर मुंबईचे खेळाडू काहीसे दडपणाखाली आले. हे दडपण दूर केले ते मुशीर खानने. त्याने ४७व्या षटकात अमन मोखाडेला पायचीत करून ही जोडी फोडली आणि यानंतर त्याने हवेत उडी घेत स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या शैलीत सेलिब्रेशन केले. त्याचा हा जल्लोष पाहून स्टेडियममध्ये उपस्थित काही प्रेक्षकांनी ‘मुंबईचा रोनाल्डो’ असे म्हणत मुशीरचे कौतुक केले.

करुणला मिळालेले जीवदान

करुण नायरने शानदार फलंदाजीने चौथा दिवस गाजवला; परंतु अवघ्या ४ धावांवर खेळत असताना त्याला जीवदान देण्याची चूक मुंबईकडून झाली. २४व्या षटकात तनुष कोटियनच्या पाचव्या चेंडूवर यष्टिरक्षक हार्दिक तामोरेला करुणच्या बॅटला स्पर्श करून गेलेला चेंडू पकडता आला नाही. या जीवदानाचा फायदा घेत करुणने महत्त्वपूर्ण खेळी केली.

धावफलक

मुंबई (पहिला डाव) : ६४.३ षटकांत सर्वबाद २२४ धावा. विदर्भ (पहिला डाव) : ४५.३ षटकांत सर्वबाद १०५ धावा. मुंबई (दुसरा डाव) : १३०.२ षटकांत सर्वबाद ४१८ धावा. विदर्भ (दुसरा डाव) : अथर्व तायडे पायचीत गो. मुलानी ३२, ध्रुव शोरी त्रि. गो. कोटियन २८, अमन मोखाडे पायचीत गो. मुशीर ३२, करुण नायर झे. तामोरे गो. मुशीर ७४, यश राठोड पायचीत गो. कोटियन ७, अक्षय वाडकर खेळत आहे. ५६, हर्ष दुबे खेळत आहे ११. अवांतर - ८. एकूण : ९२ षटकांत ५ बाद २४८ धावा. गोलंदाजी : शम्स मुलाणी २९-८-५६-१; शार्दुल ठाकूर ८-०-३५-०; धवल कुलकर्णी ५-०-२०-०; तुषार देशपांडे १०-०-३५-०; तनुष कोटियन २०-१-५६-२; मुशीर खान २०-३-३८-२.

 

टॅग्स :रणजी करंडक