Join us  

उस्मान ख्वाजाच्या भावाला अटक

उस्मान ख्वाजाच्या मोठ्या भावाला एका बनावट दहशतवादी कटात कथितप्रकरणी श्रीलंकेच्या विद्यार्थ्याला अडकविल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 4:19 AM

Open in App

मेलबोर्न : आॅस्ट्रेलियाचा पाकिस्तानी वंशाचा क्रिकेटपटू उस्मान ख्वाजाच्या मोठ्या भावाला एका बनावट दहशतवादी कटात कथितप्रकरणी श्रीलंकेच्या विद्यार्थ्याला अडकविल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या बनावट कटात आॅस्ट्रेलियाच्या आघाडीच्या राजकीय पुढाऱ्यांना मारण्याची धमकी देण्यात आली होती. न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी ३९ वर्षीय अर्सलान ख्वाजाला अटक केली. तो उस्मानचा मोठा भाऊ आहे. आॅस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज ३१ वर्षीय उस्मान ख्वाजा भारताविरुद्ध गुरुवारपासून प्रारंभ होत असलेल्या कसोटी मालिकेत खेळणार आहे. आॅगस्ट महिन्यात पोलिसांनी श्रीलंकन विद्यार्थी मोहम्मद कमर निजामुद्दीनला सिडनीमध्ये अटक केली होती. वर्षाच्या सुरुवातीला न्यू साऊथ वेल्स विद्यापीठाच्या वाचनालयाच्या कार्यालयात जप्त करण्यात आलेल्या एका नोटबुकमध्ये कथितप्रकरणी या कटाचा उल्लेख होता. त्या आधारावर या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली होती.निजामुद्दीन असलेल्या विभागातच ख्वाजा काम करीत होता. एका महिलेच्या संबंधात ख्वाजा बदला घेण्यासाठी प्रयत्नशील होता, असे आॅस्ट्रेलियन पोलीस विभागाने म्हटले आहे.नोटबुकमध्ये माजी पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल, उपपंतप्रधान ज्युली बिशप आणि माजी स्पीकर ब्रानविन बिशप यांच्या हत्येचा कट होता. याव्यतिरिक्त रेल्वेस्थानक, सिडनी ओपेरा हाऊस आणि बार्बर ब्रिज उडवण्याच्या कटाची ब्ल्यूप्रिंट होती.पीएचडी करीत असलेल्या श्रीलंकन विद्यार्थ्याने विद्यापीठीतील कुण्या विद्यार्थ्याने मला अडकवण्यासाठी हे षङ्यंत्र रचले असल्याचा दावा केला होता.निजामुद्दीनला दहशतवादाच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यानंतर चार आठवड्यांपेक्षा अधिक काळ एकांतात ठेवण्यात आले होते. त्याने आपल्या नोटबुकमध्ये हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी त्याच्यावर केला होता. त्याचे हस्ताक्षर आणि नोटबुकमध्ये असलेले हस्ताक्षर यामध्ये तफावत आढळल्यामुळे आॅक्टोबर महिन्यात त्याला सोडण्यात आले.आॅस्ट्रेलियन पोलिसांनी ख्वाजावर धोकेबाजी आणि चौकशीमध्ये अडथळा निर्माण केल्याचा आरोप लावलेला आहे. ख्वाजाने निजामुद्दीनला योजनाबद्ध पद्धतीने अडकवले असल्याचा पोलिसांनी आरोप केला आहे.पासपोर्ट पोलिसांकडे सोपविणे आणि विद्यापीठाच्या १०० मीटरच्या परिसरातून बाहेर न पडण्याच्या अटीवर ख्वाजाला जामीन देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त ख्वाजाला विद्यापीठाच्या आयटी विभागाच्या आपल्या सहकाºयांसोबत संपर्क साधण्यासह मज्जाव करण्यात आला आहे. जामीन म्हणून त्याला ५० हजार डॉलर रोख रक्कम भरण्यास सांगितले आहे.दरम्यान, अ‍ॅडिलेड ओव्हलवर उस्मान ख्वाजा म्हणाला,‘त्याच्या भावाला झालेली अटक हे पोलीस प्रकरण आहे. प्रक्रियेचा आदर राखताना यापुढे मी अधिक काही सांगू शकणार नाही.’(वृत्तसंस्था)