Join us  

टी-२० मध्ये फटकावल्या एकूण ४८८ धावा; आॅस्ट्रेलियाचा विश्वविक्रमी विजय, न्यूझीलंडवर पाच गडी राखून मात

आॅस्ट्रेलियाने शुक्रवारी टी-२० मालिकेतील पाचव्या सामन्यात लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचा विश्वविक्रम नोंदवताना न्यूझीलंडवर पाच गडी राखून मात केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारताना न्यूझीलंडने मार्टिन गुप्तीलच्या (१०५) जोरावर ६ बाद २४३ धावांचा एव्हरेस्ट उभारला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:07 AM

Open in App

आॅकलंड : आॅस्ट्रेलियाने शुक्रवारी टी-२० मालिकेतील पाचव्या सामन्यात लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचा विश्वविक्रम नोंदवताना न्यूझीलंडवर पाच गडी राखून मात केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारताना न्यूझीलंडने मार्टिन गुप्तीलच्या (१०५) जोरावर ६ बाद २४३ धावांचा एव्हरेस्ट उभारला. आॅस्ट्रेलियाने विजयासाठी आवश्यक धावा ७ चेंडू शिल्लक राखून पूर्ण केल्या. ईडन गार्डनच्या छोट्या सीमारेषा व पाटा खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल ठरली.आॅस्ट्रेलियाने ५ बाद २४५ धावा फटकावित लक्ष्य गाठताना भारताचा यापूर्वीचा २४४ धावांचा विक्रम मोडला. भारताने २०१६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध हा विक्रम नोंदवला होता. गुप्तीलने शतकी खेळी करताना टी-२० आंतरराष्ट्रीय इतिहासात सर्वाधिक धावा फटकाविणारा खेळाडू होण्याचा मान मिळवला. गुप्तीलने आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत एकूण २१८८ धावा फटकावल्या आहेत. त्याने ब्रेन्डन मॅक्युलमला मागे टाकले. मॅक्युलमने २१४० धावा फटकावल्या आहेत.गुप्तीलने ४९ चेंडूंना सामोरे जाताना शतकी खेळी केली. न्यूझीलंडतर्फे टी-२० मधील हे सर्वांत वेगवान शतक ठरले. त्याने ५४ चेंडूंमध्ये ९ षटकार व ६ चौकारांच्या मदतीने १०५ धावा केल्या. न्यूझीलंडने २४३ धावा फटकावताना टी-२० मध्ये आपल्या सर्वोच्च धावसंख्येची बरोबरी साधली. कॉलिन मुन्रोनेही वाहत्या गंगेत हात धुताना ३३ चेंडूंमध्ये ७६ धावा फटकावल्या.लक्ष्याचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व डार्सी शार्ट यांनी चार षटकांत विकेट न गमावता ५१ धावा वसूल केल्या. वॉर्नरने केवळ २० चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकले. सलामीला त्याने शार्टसोबत १२१ धावांची भागीदारी केली. फिरकीपटू ईश सोढीने वॉर्नरला ५९ धावांवर बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली.डेव्हिड वॉर्नर माघारी परतला तरी डार्सी शार्टने मात्र आक्रमकता कायम राखली. त्याने ४४ चेंडूंना सामोरे जाताना ७६ धावा फटकावल्या. त्याच्या झंझावातामुळे आॅसीने विक्रमी विजय मिळवला. शार्ट सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

टॅग्स :क्रिकेट