नाणेफेक महत्त्वाची, पण निकाल त्यावर अवलंबून नाही!

भारतीय संघाने अलीकडच्या कालावधीत प्रतिस्पर्धी संघावर गाजवलेले वर्चस्व बघता उपांत्य फेरीत हा संघ मजबूत दावेदार आहे. उपांत्य फेरीत मात्र ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 05:30 AM2019-07-09T05:30:50+5:302019-07-09T05:31:01+5:30

whatsapp join usJoin us
The toss is important, but the result is not dependent on it! | नाणेफेक महत्त्वाची, पण निकाल त्यावर अवलंबून नाही!

नाणेफेक महत्त्वाची, पण निकाल त्यावर अवलंबून नाही!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाने अलीकडच्या कालावधीत प्रतिस्पर्धी संघावर गाजवलेले वर्चस्व बघता उपांत्य फेरीत हा संघ मजबूत दावेदार आहे. उपांत्य फेरीत मात्र उभय संघातील खेळाडूंची कडवी परीक्षा राहील. जसे लांब पल्ल्याचा धावपटू आपली अखेरची झेप घेण्यापूर्वी लय राखून धावत असतो, अगदी तसेच न्यूझीलंड संघ आपल्या मर्यादा ओलांडून कामगिरी करणारा संघ अशी प्रतिमा राखण्यासाठी प्रयत्नशील राहील.
चांगल्या सुरुवातीनंतरही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय नोंदवण्यासाठी न्यूझीलंड संघाला घाम गाळावा लागला. वेस्ट इंडिजविरुद्धचा पराभव आणि ब्रेथवेटचा षटकार यांच्यादरम्यानच्या १२ इंचाच्या अंतराने वाचविले. गेल्या दोन सामन्यांत संघाला एकूण २०५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अशा स्थितीत संघाकडे गमाविण्यासाठी काहीच नाही आणि ते बेदरकारपणे मैदानात उतरतील. अशा स्थितीत भारतीय संघाला सावधगिरी बाळगावी लागेल. संघाला सुरुवातीपासून लढतीवर वर्चस्व गाजवावे लागेल. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ दडपणाखाली येईल.
भारतीय संघाने या स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली. कर्णधार व हुकमी फलंदाज विराट कोहलीच्या शतकाविना भारतीय संघाने अशी कामगिरी कशी केली, हे बघणे अधिक आश्चर्यचकित करणारे आहे.
नक्कीच भारतीय संघ आघाडीच्या तीन फलंदाजांवर अधिक अवलंबून आहे, पण चांगल्या संघाबाबत असेच असते. आतापर्यंत पहिल्या पॉवरप्लेमध्ये केवळ चार विकेट गमावल्या आहेत. कुठल्याही एका लढतीत एकापेक्षा अधिक विकेट गमावलेल्या नाही. यावरून तुम्हाला संघाच्या मजबुतीची कल्पना येते. त्यामुळे हा अधिक आकर्षित करतो. कुठला संघ कसा आपल्या ताकदीने खेळतो आणि आव्हानांना कसे सामोरे जातो, यावरच सामन्याचा निकाल निश्चित होतो.
अन्य सर्व मैदानांप्रमाणे ओल्ड ट्रॅफर्डचे मैदानही प्रथम फलंदाजीसाठी अनुकूल आहे. पण, ही एक फ्रेश खेळपट्टी असेल आणि येथे ३२५ व २९१ धावांचा पाठलाग जवजवळ झालेला आहे. निश्चितच पहिल्या उपांत्य सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल, पण सामन्याचा निकाल मात्र त्यावर अवलंबून राहणार नाही, हे नक्की.
- हर्षा भोगले


भारतीय संघाने दोन फिरकीपटूंना संधी द्यावी
भारताने विश्वचषकात आतापर्यंत बऱ्यापैकी कामगिरी केली आहे. तथापि मागच्या आठवड्यापासून संघासाठी प्रत्येकजण योगदान देत आहे. तुम्ही कमकुवत आहात की बलाढ्य, याला अर्थ नसून सामन्याच्या दिवशी कामगिरी कशी होते, यावर विजय अवलंबून असतो.
आॅस्ट्रेलियासारखा बलाढ्य संघ द. आफ्रिकेकडून पराभूत होताच समीकरण बदलले. भारताने यातून बोध घेत न्यूझीलंडला मुळीच कमजोर मानू नये. भारताने सांघिक कामगिरीवर बळ दिलेलेच आहे. रोहितने पाच शतकानंतर दिलेल्या प्रतिक्रियेतही संघासाठी विश्वचषक जिंकायचाय, असा निर्धार व्यक्त केला होता.
विश्व क्रिकेटमध्ये कोहलीचीच अधिक चर्चा होत असली तरी गेल्या तीन वर्षांत एकदिवसीय क्रिकेट रोहितनेही गाजविले. दोघांनी प्रत्येकी १८ शतके ठोकल्यामुळे भारतासाठी रोहित किती महत्त्वपूर्ण आहे, याची महती पटते. लंकेविरुद्ध जडेजाला संधी देण्यात आल्यामुळे किवींविरुद्ध अंतिम ११ जणांचा संघ कुठला राहील, याबद्दल थोडी शंका वाटते. बाद फेरीआधी कुठल्याही संघाने बदलाचा प्रयोग केला नव्हता. भारताने मात्र जडेजाला संधी दिल्याने उपांत्य सामन्यात कार्तिकला वगळून सहा गोलंदाजांना संधी मिळेल, असे दिसते.
मोठ्या सामन्याआधी जोखीम पत्करण्याचे संकेत कोहलीने पत्रकार परिषदेत दिले होते. याचा अर्थ मोहम्मद शमीला संधी मिळू शकेल. नाणेफेक जिंकल्यास भारत प्रथम फलंदाजी घेण्याची शक्यता आहे. मँचेस्टरच्या मैदानावर चेंडू अलगद वळण घेत असल्यामुळे दोन फिरकीपटू खेळवायलाच हवेत. कुलदीपचा येथे चांगला रेकॉर्ड आहे. भारताची मधली फळी कमकुवत नाहीच. अनेकजण ‘सुरुवातीचे तीन विरुद्ध अन्य’ अशी तुलना करतात. सुरुवातीच्या खेळानंतर मधल्या फळीला कौशल्य दाखविण्यास वेळ कमी असतो, पण त्यामुळे मधल्या फळीला कमकुवत मानण्याचे कारण नाही. (गेमप्लान) - सौरव गांगुली


सुरुवातीला बळी न गमाविणे महत्त्वाचे
दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या साखळी सामन्यात आॅस्ट्रेलियाचा पराभव करीत भारताची मदत केली. त्यामुळे आॅस्ट्रेलियाची दुसºया स्थानी घसरण झाल्यानंतर आता क्रिकेटमधील जुने प्रतिस्पर्धी इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया या संघांदरम्यान दुसरी उपांत्य लढत होईल. भारताला तेथे राऊंड रॉबिन लढतीत यजमान संघाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.
चाहत्यांच्याही काही इच्छा असतात. भारतीय चाहते पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर खूश असतात, मग संघाने जेतेपद पटकावले नाही तरी चालते. तीच बाब विदेशात असते. दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांना त्यांच्या संघाने कुठल्याही स्थितीत आॅस्ट्रेलियाला पराभूत करावे असे वाटते. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयामुळे द. आफ्रिका संघ आनंदात आहे. रग्बी व अन्य खेळांमधील त्यांचे हाडवैर जगजाहीर आहे. त्यामुळे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत निराशाजनक कामगिरी करणाºया द. आफ्रिका संघाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागणे आॅस्ट्रेलिया संघाच्या जखमेवर मीठ चोळल्याप्रमाणे आहे.
काहीही असो पण त्यामुळे भारताला सर्वोत्तम ठरण्याची संधी मिळाली. भारताची साखळी फेरीतील न्यूझीलंडविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाली. जर त्यांनी उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा व अंतिम फेरीत आॅस्ट्रेलियाचा पराभव केला तर भारत सर्वच संघांना पराभूत करणारा ठरेल आणि खºया अर्थाने जगज्जेता ठरेल.
रोहित शर्मा सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. आठ सामन्यांत पाच शतके व अर्धशतक त्याच्या नावावर आहे. प्रथम फलंदाजी करताना किंवा लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने शतक ठोकले आहे. राहुलने शतकी खेळी करणे ही चांगली बातमी आहे. जर सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली तर अर्धे काम सोपे होते. रोहितने कामगिरीत सातत्य राखल्यामुळे विराट कोहलीला विशेष काही करण्याची गरज भासली नाही, पण कदाचित अखेरच्या लढतींसाठी त्याची सर्वोत्तम खेळी राखीव असावी.


आघाडीच्या फळीनंतरची फलंदाजी भारतासाठी चिंता ठरू शकते. त्यामुळे सुरुवातीला विकेट न गमाविणे भारतासाठी महत्त्वाचे ठरते. मँचेस्टरमधील वातावरण ट्रेंट बोल्टला आवडते. अन्य मैदानांच्या तुलनेत येथे चेंडू अधिक स्विंग होतो. येथील वातावरणाची मदत भुवनेश्वर, बुमराह व शमी यांनाही मिळण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडचे फलंदाज फिरकी गोलंदाजीच्या तुलनेत वेगवान माºयाला चांगले खेळतात, हा अनुभव लक्षात घेता चहल व कुलदीप या दोघांनाही खेळविण्याची योजना वाईट नाही. न्यूझीलंड संघासाठी विलियम्सन व टेलर हे महत्त्वाचे फलंदाज आहेत आणि ते जर लवकर बाद झाले तर त्यांच्या उर्वरित खेळाडूंवर मोठे दडपण येईल. - सुनील गावसकर

Web Title: The toss is important, but the result is not dependent on it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.