Join us  

तेंडुलकर, संगकारा आणि जयवर्धने सर्वोत्तम फलंदाज : पानेसर

मॉन्टी म्हणाला, वीरेंद्र सेहवाग त्याच्या कारकिर्दीतील सर्वांत आक्रमक फलंदाज होता आणि राहुल द्रविड ‘भिंती’प्रमाणे होता, पण परिस्थितीसोबत जुळवून घेण्याच्या कलेमुळे तेंडुलकर सर्वोत्तम होता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 1:22 AM

Open in App

नवी दिल्ली : इंग्लंडचा फिरकीपटू मॉन्टी पानेसरने ११ कसोटी सामन्यात चारवेळा सचिन तेंडुलकरला बाद केले आहे. पण त्याच्या मते, हा भारतीय फलंदाज, श्रीलंकेचा कुमार संगकारा व माहेला जयवर्धने यांच्यासह त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फलंदाज आहेत. मॉन्टी म्हणाला, वीरेंद्र सेहवाग त्याच्या कारकिर्दीतील सर्वांत आक्रमक फलंदाज होता आणि राहुल द्रविड ‘भिंती’प्रमाणे होता, पण परिस्थितीसोबत जुळवून घेण्याच्या कलेमुळे तेंडुलकर सर्वोत्तम होता.इंग्लंडतर्फे ५० कसोटी सामने खेळणाऱ्या पानेसरने नागपूरमध्ये २००६ ला आपल्या पहिल्या सामन्यात तेंडुलकरला बाद केले होते. मॉन्टी म्हणाला, ‘सचिन स्थिरावला तर मोठी खेळी करीत होता, पण प्रत्येक फलंदाजाप्रमाणे त्याच्यातही उणीव होती. खेळपट्टीवर जम बसल्यानंतर तो वेगळा फलंदाज भासत होता. सचिनला बाद करणे कठीण होते. तो कुठल्या चेंडूवर कुठला फटका खेळेल, याची कल्पना करता येत नव्हती. द्रविडही महान फलंदाज होता. तो ज्यावेळी फलंदाजी करीत होता त्यावेळी असे वाटायचे की त्याची बॅट अन्य फलंदाजांच्या तुलनेत अधिक रुंद आहे. सेहवाग माझ्या काळातील सर्वांत आक्रमक फलंदाज होता.’युवराजने अलीकडेच म्हटले होते की, सध्याच्या भारतीय संघात कोहली व रोहित यांचा अपवाद वगळता कुणी रोलमॉडेल नाही आणि पानेसरने त्यावर सहमती दर्शवली.(वृत्तसंस्था)