Join us  

तीन कसोटी जिंकण्याची टीम इंडियाला संधी

आपल्या ८५ वर्षांच्या कसोटी इतिहासात आतापर्यंत विदेशात केवळ एकदा कसोटी मालिकेत ३ सामने जिंकण्याची कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला आता श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत केवळ ५० वर्षांत या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी प्राप्त झाली नसून, विदेशात प्रथमच सलग ३ कसोटी सामने जिंकण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 2:53 AM

Open in App

नवी दिल्ली : आपल्या ८५ वर्षांच्या कसोटी इतिहासात आतापर्यंत विदेशात केवळ एकदा कसोटी मालिकेत ३ सामने जिंकण्याची कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला आता श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत केवळ ५० वर्षांत या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी प्राप्त झाली नसून, विदेशात प्रथमच सलग ३ कसोटी सामने जिंकण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने श्रीलंकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले २ सामने सहज जिंकले आहेत. जर पल्लेकलमध्ये १२ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या व अंतिम कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयी मोहीम कायम राखण्यात यशस्वी ठरला, तर विदेशात ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप देणारा हा पहिला भारतीय संघ ठरेल.विदेशात क्लीन स्वीपचा विचार केला, तर भारताने आतापर्यंत केवळ बांगलादेश व झिम्बाब्वे यांच्याविरुद्ध अशी कामगिरी केली आहे. पण, या मालिकांत केवळ एक किंवा दोन सामने मर्यादित होते. भारताने २०००मध्ये बांगलादेशाचा एका कसोटी सामन्याच्या मालिकेत १-० ने, तर २००४ व २०१०मध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने पराभव केला होता.भारताने मायदेशात खेळताना यापूर्वी ३ किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप केलेले आहे. भारताने आॅस्ट्रेलियाचा ४ सामन्यांच्या मालिकेत ४-० ने पराभव केला. मोहंमद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखालील संघाने १९९३-९४ मध्ये इंग्लंड व श्रीलंका या संघांविरुद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीपची नोंद केली आहे. कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध या पराक्रमाची पुनरावृत्ती केली.सध्या सुरू असलेल्या मालिकेत भारताने गालेमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा ३०४ धावांनी, तर कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव ५३ धावांनी पराभव केला. फॉर्मचा विचार करता, भारतीय संघ पल्लेकलमध्ये विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून सहभागी होणार आहे.भारताने यापूर्वी पल्लेकलमध्ये कसोटी सामना खेळलेला नाही. श्रीलंका संघ येथे ५ कसोटी सामने खेळला असून, त्यात एक विजय व एक पराभव, अशी कामगिरी आहे. उर्वरित ३ सामने अनिर्णीत संपले. भारताने पल्लेकलमध्ये एक वन-डे व एक टी-२० सामना खेळला असून, त्या दोन्ही लढतींमध्ये टीम इंडियाने विजय मिळविला आहे. (वृत्तसंस्था)गतवर्षी इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेला नमविले होतेसध्या सुरू असलेल्या मालिकेपूर्वी भारताला १९८६मध्ये इंग्लंडमध्ये ३ कसोटी सामने जिंकण्याची संधी मिळाली होती; पण कपिल देवच्या नेतृत्वाखालील संघाने पहिले २ सामने जिंकल्यानंतर तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राखला होता.पाकिस्तानविरुद्ध २००४मध्ये पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर भारताने दुसरा कसोटी सामना गमावला होता; पण तिसरा कसोटी सामना जिंकून मालिका विजय साकारला होता. गेल्या वर्षी भारतीय संघाने इंग्लंडचा ५ सामन्यांच्या मालिकेत ४-० ने पराभव केला, तर २०१५मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ४ सामन्यांची मालिका ३-० ने जिंकली होती.भारताने यापूर्वी केवळ एकदा विदेशात मालिकेमध्ये ३ कसोटी सामने जिंकण्याची कामगिरी केली आहे. मन्सूर अली खाँ पतोडी यांच्या नेतृत्वाखालील संघाने फेब्रुवारी-मार्च १९६८मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने विजय मिळविला होता. दरम्यान, या मालिकेत ड्युनेडिन येथे पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर ख्राईस्ट चर्चमध्ये दुसºया कसोटी सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर भारताने वेलिंग्टन व आॅकलंड कसोटी सामने जिंकले होते.