Join us  

टीम इंडियाची सरशी, आॅस्ट्रेलियावर डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर ९ गड्यांनी मात

गोलंदाजांच्या अचूक मा-यानंतर शिखर धवन (नाबाद १५) व विराट कोहली (नाबाद २२) यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने शनिवारी पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात आॅस्ट्रेलियाचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर ३ चेंडू व ९ गडी राखून पराभव केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 5:16 AM

Open in App

रांची : गोलंदाजांच्या अचूक मा-यानंतर शिखर धवन (नाबाद १५) व विराट कोहली (नाबाद २२) यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने शनिवारी पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात आॅस्ट्रेलियाचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर ३ चेंडू व ९ गडी राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताने आॅस्ट्रेलियाचा डाव १८.२ षटकांत ८ बाद ११८ धावांत रोखला. त्यानंतर पावसाचा व्यत्यय निर्माण झाला. डकवर्थ-लुईस नियमानुसार भारतापुढे ६ षटकांत ४८ धावा फटकावण्याचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. भारताने विजयासाठी आवश्यक धावा ५.३ षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. रोहित शर्मा (११ धावा, ७ चेंडू) बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली (नाबाद २२ धावा, १४ चेंडू, ३ चौकार) व सलामीवीर शिखर धवन (नाबाद १५ धावा, १२ चेंडू, ३ चौकार) यांनी दुसºया विकेटसाठी ३८ धावांची अभेद्य भागीदारी करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. टी-२० क्रिकेटमध्ये आॅस्ट्रेलियाची भारताविरुद्धची निराशाजनक कामगिरी कायम राहिला. आतापर्यंत उभय संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या १४ पैकी १० सामन्यांत आॅस्ट्रेलियाला पराभव स्वीकारावा लागला आहे.त्याआधी, गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारताने आॅस्ट्रेलियाला १८.४ षटकांत ११८ धावांत रोखले. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबविण्यात आला त्यावेळी आॅस्ट्रेलियाने १८.४ षटकांत ८ बाद ११८ धावा केल्या होत्या. हा संघाचा अंतिम स्कोअर मानला गेला.भारतीय गोलंदाजांपुढे आॅस्ट्रेलियाची फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. अ‍ॅरोन फिंचचा (४२) अपवाद वगळता आॅस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाजांना खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. आॅस्ट्रेलियाच्या केवळ तीन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदवता आली. कर्णधार स्टीव्हन स्मिथने खांद्याच्या दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घेतली असून तो मायदेशी परतला आहे. त्याच्या स्थानी डेव्हिड वॉर्नरने संघाचे नेतृत्व केले, पण त्याला फलंदाजीमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरविताना आॅस्ट्रेलियाच्या सलामीवीरांना आक्रमक फलंदाजी करण्यापासून रोखले. भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर वॉर्नर चुकला व क्लीनबोल्ड झाला. त्यानंतर फिंचने ग्लेन मॅक्सवेलच्या साथीने दुसºया विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. यजुवेंद्र चहलने सातव्या षटकात मॅक्सवेलला (१७) बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. चहलच्या गोलंदाजीवर षटकार ठोकणाºया फिंचला चायनामन गोलंदाज कुलदीपने तंबूचा मार्ग दाखवला. त्याने ४ चौकार व एक षटकारासह ४२ धावा केल्या.फिंच दहाव्या षटकांत संघाची ७६ धावसंख्या असताना बाद झाला. मोईजेस हेन्रिक्स यादवचा दुसरा बळी ठरला. त्यानंतर ट्रॅव्हिस हेड माघारी परतला. त्याला हार्दिक पांड्याने बोल्ड केले. दरम्यान यष्टिरक्षक फलंदाज टीम पेन १५ व्या षटकांत चहलच्या गोलंदाजीवर तीनदा सुदैवी ठरला. १८ व्या षटकात बुमराहने त्याला बाद केले. बुमराहने या षटकात पेन (१७) व नाईल (१) यांना बाद केले. भारतातर्फे जसप्रीत बुमराह व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन तर भुवनेश्वर, पांड्या व चहल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. (वृत्तसंस्था)धावफलकआॅस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. भुवनेश्वर ०८, अ‍ॅरोन फिंच त्रि. गो. कुलदीप यादव ४२, ग्लेन मॅक्सवेल झे. बुमराह गो. चहल १७, हेड त्रि. गो. पांड्या ०९, हेन्रिक्स त्रि. गो. कुलदीप यादव ०८, ख्रिस्टियन धावबाद ०९, पेन त्रि. गो. बुमराह १७, नॅथन कुल्टर नाईल त्रि.गो. बुमराग ०१, टाय नाबाद ००, जम्पा नाबाद ०४. अवांतर (३). एकूण १८.४ षटकांत ८ बाद ११८ (पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला). गोलंदाजी : भुवनेश्वर ३.४-०-२८-१, बुमराह ३-०-१७-२, पांड्या ४-०-३३-१, चहल ४-०-३३-१, कुलदीप यादव ४-०-१६-२.भारत :- रोहित शर्मा त्रि. गो. कुल्टर नाईल ११, शिखर धवन नाबाद १५, विराट कोहली नाबाद २२. अवांतर (१). एकूण ५.३ षटकांत १ बाद ४९. बाद क्रम : १-११. गोलंदाजी : बेहेरडोर्फ १-०-५-०, कुल्टर नाईल २-०-२०-१, टाय १-०-१०-०, जम्पा १-०-६-०, ख्रिस्टियन ०.३-०-७-०.

टॅग्स :क्रिकेट