Join us  

टी-२० मालिका : इंग्लंडच्या आव्हानास भारत सज्ज

क्रिकेटच्या सर्वांत जलद स्वरुपामध्ये गेल्या काही दिवसांपासून वर्चस्व गाजविणाऱ्या भारतीय संघाची मंगळवारी पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याद्वारे इंग्लंड दौ-यातील कडव्या आव्हानाची सुरुवात होणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 2:38 AM

Open in App

मँचेस्टर : क्रिकेटच्या सर्वांत जलद स्वरुपामध्ये गेल्या काही दिवसांपासून वर्चस्व गाजविणाऱ्या भारतीय संघाची मंगळवारी पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याद्वारे इंग्लंड दौ-यातील कडव्या आव्हानाची सुरुवात होणार आहे.इंग्लंड संघाने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगली प्रगती केली आहे. त्यामुळे विराट कंपनीसाठी हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या एक दशकापासून भारतीय संघाने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कामगिरीत सातत्य राखल्याचे दिसून येत आहे तर इंग्लंडला जोस बटलर, जेसन राय व बेन स्टोक्स यांच्यासारख्या स्टार खेळाडूंच्या जोरावर अखेर वन-डे व टी-२० सामन्यांत सूर गवसल्याचे दिसून येत आहे. वन-डे विश्वकप २०१९ ला आता १२ महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असून उभय संघांसाठी तयारीच्या दृष्टीने ही चांगली संधी आहे. भारताने या मालिकेपूर्वी पहिल्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेत आयर्लंडचा ७२ व १४३ धावांनी पराभव केला, पण इंग्लंड संघाचे आव्हान खडतर आहे, याची कोहलीला चांगली कल्पना आहे.भारताने गेल्या २० टी-२० सामन्यांपैकी १५ सामन्यांत विजय मिळवल्याने संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. इंग्लंड संघाने भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आॅस्ट्रेलियाचा ६-० ने धुव्वा उडवला आहे. या विजयात बटलर, जेसन रॉय व जॉनी बेयरस्टा यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. जून २०१७ पासून इंग्लंडने दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी पाचमध्ये विजय मिळवला आहे. आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध मार्चमध्ये खेळल्या गेलेल्या तिरंगी मालिकेत मात्र संघाला चारपैकी तीनमध्ये पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघासाठी आयर्लंडचा दौरा सराव सामन्यांपेक्षा विशेष काही नव्हता. (वृत्तसंस्था)संघांत हार्दिक पांड्या हा एकमेव अष्टपैलू आहे. अशा स्थितीत कृणाल व चहर यांना प्रतीक्षा करावी लागू शकते. मधल्या फळीत कोहली अधिक बदल करण्याची आशा नाही. कोहली, सुरेश रैना व महेंद्रसिंग धोनी मधल्या फळीची जबाबदारी सांभाळण्यास सक्षम असून मनीष पांडेची नजर चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजावर राहील.जसप्रीत बुमराहच्या अंगठ्याला झालेली दुखापत संघासाठी चिंतेचा विषय आहे. त्याचा पर्याय म्हणून संघात निवड झालेल्या दीपक चहरला पदार्पणाची संधी मिळते का, याबाबत उत्सुकता आहे. वरिष्ठ गोलंदाज उमेश यादवला बुमराहचा संभाव्य पर्याय मानल्या जात आहे. भारतीय संघ निश्चित संयोजनासह खेळण्याची आशा आहे. जर एका फिरकीपटूला वगळण्यात आले तर सिद्धार्थ कौलच्या नावावर विचार होण्याची शक्यता आहे.भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हार्दिक पांड्या, सिद्धार्थ कौल आणि उमेश यादव.इंग्लंड : इयोन मोर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टा, जॅक बाल, जोस बटलर, सॅम कुरेन, अ‍ॅलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, लियाम प्लंकेट, आदिल राशिद, जो रूट, जेसन राय, डेव्हिड विली आणि डेव्हिड मलान.सामना : भारतीय वेळेनुसार रात्री १०.०० वाजल्यापासून

टॅग्स :क्रिकेट