Join us  

माणुसकीचा झरा : संकटकाळात क्रिकेटपटू स्वप्नील आस्नोडकरचा प्लाझ्मा दानासाठी पुढाकार!

रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. मात्र, सध्या कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा जा‌णवत आहे. कोरोना काळात रुग्णांना बरे होण्यासाठी ‘प्लाझ्मा’ उपयोगी पडत असल्याने त्याची अधिक गरज जाणवू लागली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 8:02 PM

Open in App

सचिन कोरडेपणजी : रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. मात्र, सध्या कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा जा‌णवत आहे. कोरोना काळात रुग्णांना बरे होण्यासाठी ‘प्लाझ्मा’ उपयोगी पडत असल्याने त्याची अधिक गरज जाणवू लागली आहे. दुसऱ्याचा प्राण वाचविण्यासाठी प्लाझ्मा दान पेक्षा सध्या मोठी मदत नाही, असे सांगत गोव्याचा ‘मास्टर ब्लास्टर’ स्वप्नील अस्नोडकर याने बुधवारी गोवा मेडिकल काॅलेजमध्ये प्लाझ्मा दान केला. मैदानावर शतक झळकावल्यानंतरचा जो आनंद असतो तोच होत आहे, अशी भावना त्याने व्यक्त केली. 

स्वप्नील अस्नोडकर हा गोव्याचा माजी रणजीपटू आहे. सध्या तो जीसीएत प्रशिक्षक म्हणून खेळाडूंना मार्गदर्शन करतोय. कोविडमुळे क्रिकेटचे वेळापत्रक कोलमडले असले तरी खेळाडू दैनंदिन कार्यक्रमात व्यस्त आहेत. अशा स्थितीत स्वप्नील अस्नोडकरने प्लाझ्मा दान साठी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे. स्वप्नील जानेवारी महिन्यात पाॅझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर तो १४ दिवस होम क्वारंटाईन होता. फेब्रुवारी महिन्यात बंगळूरुमध्ये तो संघासोबत गेला होता. त्यावेळी त्याने दुसऱ्यांदा चाचणी केली होती. तेव्हा ती निगेटिव्ह आली होती. तेव्हापासून प्लाझ्मा दान करण्याच्या विचारात होता. अखेर बुधवारी गोमेकाॅत त्याने प्लाझ्मा दान केला. येथे कोविड रुग्णांना प्लाझ्माची अत्यंत आवश्यकता आहे. बरेच लोक समाजमाध्यमांवर मदतीचे आवाहनही करीत आहेत. अशा संकटात आपण छोटे का होईना योगदान देऊ शकलो, याचे समाधान वाटत आहे, अशी भावना  त्याने ‘लोकमत’कडे व्यक्त केली.  

का करावे दान..कोविड-१९ या आजारातून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तामध्ये कोविड-१९ या विषाणू विरोधी प्रोटिन तयार होते. हे प्रोटिन कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या प्लाझ्मा मार्फत, जर एखाद्या कोविड संसर्ग झालेल्या रुग्णास दिले तर हे प्रोटिन कोरोना विषाणूला मारायला मदत करते व रुग्ण लवकर बरा होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे प्लाझ्माला मोठी मागणी आहे. 

प्रत्येकाने पुढे यावे...ज्यांनी कोरोनावर मात केलेली आहे अशांनी प्लाझ्मा दानसाठी पुढे यायला हवे. तुमच्या या मदतीमुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. इस्पितळात प्लाझ्माचा तुटवडा आहे. एक सामाजिक जबाबदारी म्हणून युवकांनी पुढे यावे, असे या निमित्ताने मी आवाहन करतो. प्लाझ्मा दान करण्याअगोदर मनात थोडी भीती होती. मात्र, दान केल्यानंतर ती गेली. मला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसून मी पूर्णपणे फिट आहे. त्यामुळे इतरांनी नि:संशयपणे प्लाझ्मा दान करायला हवे.

टॅग्स :गोवाकोरोना वायरस बातम्या