पालेकल्ले : सुरंगा लकमल याने मोक्याच्या क्षणी तीन गडी बाद केल्यामुळे श्रीलंकेने द. आफ्रिकेचा डकवर्थ-लुईस नियमानुसार पराभव केला. त्याचप्रमाणे तब्बल ४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लंकेने दक्षिण आफ्रिकेला नमविण्यात यश मिळवले.
अष्टपैलू दासून शनाका याने ३४ चेंडूत ६५ धावा चोपल्या. लंकेने पावसाचा व्यत्यय आलेल्या या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ३९ षटकांत ७ बाद ३०६ धावा उभारल्या. खराब हवामानामुळे आफ्रिकेला डकवर्थ-लुईस नियमानुसार २१ षटकांत विजयासाठी १९१ धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र, दक्षिण आफ्रिकेला निर्धारीत षटकात ९ बाद १८७ पर्यंत मजल मारता आली.
लकमलने प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आणि सलामीवीर क्वींटन डिकॉक याला बाद केले. पाठोपाठ विलेम मुल्डर आणि डेव्हिड मिलर यांना तंबूची वाट दाखवून पाहुण्यांच्या आशेवर पाणी फेरले. याआधी लंका संघ द. आफ्रिकेकडून सलग ११ सामन्यात पराभूत झाला होता. २०१४ मध्ये याच मैदानावर त्यांनी आफ्रिकेला नमविले होते.
द. आफ्रिकेने सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकून याआधीच मालिका खिशात टाकली आहे. आठव्या स्थानावर फलंदाजी करणाऱ्या शनाकाने चार चौकार आणि पाच षटकारांच्या साहाय्याने कारकिर्दीमधील पहिले अर्धशतक ठोकले. तिसारा परेरा (नाबाद ५१), कुसाल परेरा (५१), उपुल थरंगा (३६) आणि निरोशन डिकवेला (३४) यांनी आक्रमक फटकेबाजी केली. द. आफ्रिकेकडून जेपी ड्यूमिनी आणि लुंगी एनगिडी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.