Join us  

सेन याने साधले विजेतेपदाचे ‘लक्ष्य’

भारताचा उदयोन्मुख शटलर लक्ष्य सेन याने शानदार कामगिरी करताना बल्गेरिया ओपन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन सिरीजचे विजेतेपद पटकावले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 4:05 AM

Open in App

नवी दिल्ली : भारताचा उदयोन्मुख शटलर लक्ष्य सेन याने शानदार कामगिरी करताना बल्गेरिया ओपन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन सिरीजचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात लक्ष्यने क्रोएशियाच्या ज्वेनिमिर डुर्किंजाक याला पराभवाचा धक्का देत जेतेपदाला गवसणी घातली.स्पर्धेत दुसरे मानांकन लाभलेल्या ज्वेनिमारने अपेक्षित सुरुवात करताना सामन्यातील पहिला गेम जिंकला. यावेळी पिछाडीवर पडलेल्या लक्ष्यने शांतपणे खेळ करताना जबरदस्त पुनरागमन करत सलग दोन दोन गेम जिंकले आणि १८-२१, २१-१२, २१-१७ अशा शानदार विजयासह जेतेपद उंचावले. १६ आॅगस्टलाचा आपला १६वा वाढदिवस साजरा केलेल्या उत्तराखंडच्या लक्ष्यने ज्वेनिमिरला ५७ मिनिटांच्या चुरशीच्या लढतीत धक्का दिला. याआधी उपांत्य फेरीत लक्ष्यने श्रीलंकेच्या दिनुका करुणारत्ने याला २१-१९, २१-१४ असे सरळ दोन गेममध्ये पराभूत केले होते.जागतिक ज्यूनिअर खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानी राहिलेल्या लक्ष्यला नुकताच माजी आॅल इंग्लंड चॅम्पियन पीटर गेड याच्याकडे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. सध्या गेड फ्रान्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.बल्गेरिया स्पर्धेत लक्ष्यने खूप जबरदस्त खेळ केला. त्याने पहिल्याच फेरीत अग्रमानांकीत सॅम पारसन्सला नमवले. (वृत्तसंस्था)।लक्ष्यचा खेळ सध्या जबरदस्त होत आहे. राष्ट्रीय स्पर्धेच्या वरिष्ठ गटातील अंतिम सामन्यात एच. एस. प्रणॉय सारख्या दिग्गज खेळाडूला नमवले होते. या विजयानंतर त्याचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला होता. जर त्याला आणखी योग्य प्रशिक्षण मिळाले, तर निश्चित भविष्यात तो आणखी दमदार कामगिरी करेल. पुढील दोन महिन्यात लक्ष्य व्हिएतनाम ग्रां. प्री. आणि त्यानंतर ज्यूनिअर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळेल.- विमल कुमार, लक्ष्यचे प्रशिक्षक