Join us  

साईनाथने विजयाचे खाते खोलले, पय्याडे स्पोर्ट्स क्लबचा पराभव

आज या क्रिकेट स्पर्धेचा चौथा दिवस रंगला होता.

By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 24, 2022 3:36 PM

Open in App

ठाणे : पहिल्या सामन्यात केलेल्या चुका टाळल्याने साईनाथ स्पोर्ट्स क्लबने पय्याडे स्पोर्ट्स क्लबचा २० धावांनी पराभव करत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब आयोजित अर्जुन मढवी स्मृती महिला टी ट्वेन्टी लीग क्रिकेट स्पर्धेत विजयाचे खाते खोलले. सामन्यात अष्टपैलू खेळ करणाऱ्या साईनाथ संघाची कर्णधार आरुषी तामसेला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

आज या क्रिकेट स्पर्धेचा चौथा दिवस रंगला होता. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना साईनाथ क्रिकेट क्लबने १८ षटकात ६ बाद १२९ अशी मजल मारली. सामन्यातील प्रत्येक डावाकरता ८५ मिनिटांची मर्यादा असल्याने या निर्धारित वेळेत संपलेल्या षटकानंतर डाव समाप्त करण्यात आला. सेजल विश्वकर्माने २९. आरुषी तामसेने २० आणि वेदिका राजेश पाटीलने २१ धावांचे योगदान दिले. पय्याडे स्पोर्ट्स क्लबकडून रिद्धी ठक्कर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने एका निर्धाव षटकासह ३१ धावांत तीन विकेट्स मिळवल्या. 

रिद्धी कोटेचा आणि अक्षरा पिल्लईने प्रत्येकी एक विकेट मिळवली. त्यानंतर साईनाथ क्रिकेट क्लबच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर पय्याडे स्पोर्ट्स क्लबच्या फलंदाजांना सहजासहजी धावा मिळू दिल्या नाहीत. पय्याडे क्रिकेट क्लबच्या ६ बाद १०९ धावसंख्येत आयुषी सिंगच्या ३६ आणि रुही आधारकरचा ३० धावांचा वाटा होता. आरुषी तामसे, वेदिका राजेश पाटील, निधी घरत, वेदल राऊत आणि अंशु पालने प्रत्येकी एक विकेट मिळवली. 

संक्षिप्त धावफलक -साईनाथ स्पोर्ट्स क्लब : १८ षटकात ६ बाद १२९ ( आरुषी तामसे २०, सेजल विश्वकर्मा २९, वेदिका राजेश पाटील २१, रिद्धी ठक्कर ४-१-३१-३ रिद्धी कोटेचा ३-२७-१, अक्षरा पिल्लई ४-१-१५-१) विजयी विरुद्ध पय्याडे स्पोर्ट्स क्लब १८ षटकात ६ बाद १०९ ( आयुषी सिंग ३६, रुही आधारकर ३०, वेदिका राजेश पाटील ३-२३-१, निधी घरत ४-१०-१, वेदल राऊत ४-२४-१, अंशु पाल ३-१२-१, आरुषी तामसे १-१-१, प्राप्ती निबडे १-१०-१). सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू - आरुषी तामसे.

टॅग्स :ठाणे
Open in App