Join us  

आरसीबी मोठ्या विजयासाठी सज्ज

मागच्या तीन सामन्यात विजय मिळताच आत्मविश्वास उंचावलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ आयपीएलमध्ये आज शनिवारी राजस्थान रॉयल्सवर मोठ्या विजयाच्या शोधात आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:08 AM

Open in App

जयपूर : मागच्या तीन सामन्यात विजय मिळताच आत्मविश्वास उंचावलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ आयपीएलमध्ये आज शनिवारी राजस्थान रॉयल्सवर मोठ्या विजयाच्या शोधात आहे. राजस्थानला जोस बटलर आणि बेन स्टोक्स यांची उणीव जाणवेल. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांचे समान १२-१२ गुण आहेत. आरसीबी पाचव्या आणि राजस्थान गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.प्ले आॅफच्या शर्यतीत पाच संघ असल्याने चुरस निर्माण झाली. दोन्ही संघ विजयासह धावगती वाढविण्याचादेखील प्रयत्न करणार आहेत. रॉयल्ससाठी प्रत्येक सामन्यात मोठी भूमिका वठविणारे बटलर आणि स्टोक्स मायदेशी परतले. संघाचा मेंटर शेन वॉर्न हादेखील डग आऊटमध्ये दिसणार नाही. आरसीबीने काल सनरायझर्सचा १४ धावांनी पराभव करीत सलग तिसरा विजय साजरा केला. पण आज जो संघ पराभूत होईल तो बाहेर पडणार असल्याने उभय संघ सावध वाटचाल करणार आहेत.कोहली, डिव्हिलियर्स, पार्थिव, मनजीतसिंग आणि मोईन अली यांच्या तडफदार फलंदाजीपुढे रॉयल्सचे गोलंदाज जोफ्रा आर्चर, जयदेव उनाडकट, धवल कुलकर्णी आणि गौतम यांना टिच्चून मारा करावा लागेल. रॉयल्सची फलंदाजी बऱ्याचअंशी कर्णधार अजिंक्य रहाणेवर विसंबून आहे. संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी, स्टुअर्ट बिन्नी यांच्याकडून धावांची अपेक्षा असेल. या फलंदाजांना उमेश यादव तसेच टिम साऊदी यांचा भेदक मारा टोलवावा लागणार आहे. फिरकीत युजवेंद्र चहलसारखा तरबेज गोलंदाज आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआयपीएल 2018