बंगळुरू : दोन सामन्यात प्रत्येकी दोन गुण घेणाऱ्या राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघांदरम्यानची लढत रविवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर अनुभवयास मिळणार आहे.
आरसीबीने ए. बी. डिव्हिलियर्सच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाबला चार गड्यांनी पराभूत करत या सत्रातील पहिला विजय नोंदवला. राजस्थानने घरच्या मैदानावर पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सला १० धावांनी पराभूत केले.
डिव्हिलियर्स आपला फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न करेल. तर डीकॉकही त्याला चांगली साथ देत आहे. दोन सामन्यात ५२ धावा करणारा कर्णधार विराट कोहली या सामन्यात मोठी खेळी करण्यास उत्सुक असणार आहे.
दुसरीकडे अजिंक्य रहाणे व संजू सॅमसनवर राजस्थानची भिस्त आहे. रहाणेने दोन सामन्यांत ८६ धावा केल्या आहेत. बिग बॅशस्टार खेळाडू डार्सी शॉर्ट मागील सामन्यातील अपयश धुऊन काढण्याची शक्यता आहे. या सत्रातील आयपीएल लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरलेला बेन स्टोक्स अद्याप आपल्या कौशल्याला न्याय देऊ शकलेला नाही. त्याने दोन सामन्यांत २१ धावा केल्या आहेत.
सामन्याची वेळ : सायं. ४ वाजता
स्थळ : एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलोर