इंदूर : गेल्या काही दिवसांपासून इंदूरमध्ये संततधार पाऊस सुरू आहे. अशीच परिस्थिती २४ रोजी होणा-या मालिकेतील तिस-या एकदिवसीय सामन्यातदेखील राहण्याची शक्यता आहे. तिस-या एकदिवसीय सामन्यात पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे काही षटकांचा खेळ कमी होऊ शकतो.
छत्तीसगड आणि परिसरातील क्षेत्रात कमी दाबाची स्थिती आहे. त्यामुळे मध्य भारतात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे येथे होणारा एकदिवसीय सामनादेखील अडचणीत येऊ शकतो. हवामान विभागाच्या एका अधिका-याने सांगितले की, ‘२४ सप्टेंबर रोजी हवामान विभागाच्या स्थितीत सुधारणा केली जाऊ शकते.’
हवामान विभागाचे भोपाळ केंद्राचे संचालक इंद्रजित शर्मा यांनी सांगितले की, ‘पुढच्या ४८ तासात हवामानात सुधारणा होईल. सामना दिवस-रात्र असल्याने सायंकाळी हवामान चांगले राहण्याची शक्यता आहे. यावेळी पाऊस होऊ शकतो.’
इंदूरमध्ये शुक्रवारी पहाटेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत पाऊस पडत होता. त्यानंतर फक्त ३ तास होळकर स्टेडियमवरील कव्हर हटवण्यात आले. ग्राउंड्समन पिचला अंतिम रूप देण्याच्या कामाला लागले आहे. आउटफिल्ड अजूनही ओले आहे. मात्र खेळपट्टी कोरडी आहे. क्युरेटर समंदरसिंह चौहान यांनी सांगितले की, ‘मैदानातील सांडपाणी निचरा करणारी यंत्रणा अद्ययावत असल्याने मैदान कोरडे होण्यास फारसा वेळ लागणार नाही.’ (वृत्तसंस्था)