Join us  

प्रणवने क्रिकेट सोडल्याची ‘अफवा’च

मुंबई : शालेय क्रिकेटमध्ये तब्बल १००९ धावांची विश्वविक्रमी नाबाद खेळी करुन जागतिक क्रिकेटचे लक्ष वेधणारा कल्याणचा प्रणव धनावडे पुन्हा एकदा चर्चेत आला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:19 AM

Open in App

मुंबई : शालेय क्रिकेटमध्ये तब्बल १००९ धावांची विश्वविक्रमी नाबाद खेळी करुन जागतिक क्रिकेटचे लक्ष वेधणारा कल्याणचा प्रणव धनावडे पुन्हा एकदा चर्चेत आला. मात्र, यावेळी फलंदाजीतील कामगिरीमुळे नाही, तर चक्क क्रिकेट सोडल्याची बातमी पसरल्याने पुन्हा एकदा प्रणव चर्चेत आला. मात्र, त्याचे वडील प्रशांत धनावडे यांनी मात्र या वृत्ताचे खंडन करताना, तो सध्या भिवंडी येथे क्रिकेट शिबीरामध्ये सहभागी झाल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.काही वृत्त संकेतस्थळांनी गुरुवारी विश्वविक्रमवीर फलंदाज प्रणव याने क्रिकेट सोडल्याचे वृत्त देत एकच खळबळ माजवली. सततच्या खराब फॉर्मला कंटाळून प्रणवने क्रिकेट सोडल्याचे वृत्त या संकेतस्थळांनी दिले. मात्र, प्रणवचा फॉर्म चांगला असून तो फलंदाजी आणि यष्टीरक्षणामध्ये चांगली कामगिरी करत असल्याचेही प्रशांत यांनी सांगितले.प्रणवचे वडिल प्रशांत हे रिक्षा चालक असून हजार धावांची खेळी केल्यानंतर प्रणव एका दिवसात स्टार झाला होता. यानंतर मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) त्याला महिना १० हजार रुपयांची शिष्यवृत्तीही जाहीर केली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी कामगिरी खालावल्याने प्रणव व त्याच्या वडिलांनी स्वत:हून पत्र लिहून एमसीएला शिष्यवृत्ती थांबविण्याची विनंती केली होती.>नाबाद १००९ धावांची विश्वविक्रमी खेळी केल्यानंतर प्रणवची कमागिरी खालावली होती. मात्र त्याने पुन्हा एकदा भरारी घेताना शालेय क्रिकेटध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली. ‘शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी आम्ही प्रणवचे क्रिकेट सुरु केले होते,’ असे प्रशांत यांनी म्हटले.‘तो भविष्यात यशस्वी होईल की नाही, ही पुढची गोष्ट असेल. पण, सध्या तरी त्याचे क्रिकेट थांबणार नाही. त्याची कामगिरी चांगली होत असून तो फलंदाजीसह यष्टीरक्षणामध्येही चमक दाखवत आहे. त्याचा फॉर्म सध्या चांगला आहे,’ असेही प्रणवचे वडिल प्रशांत यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :क्रिकेट