अबुधाबी : मधल्या फळीतील फलंदाज बाबर आझम (९९) आणि कर्णधार सर्फराज अहमद (८१) यांच्या अर्धशतकी खेळीनंतर पाकिस्तानने गुरुवारी तिसऱ्या दिवशी आॅस्ट्रेलियाला विजयासाठी ५३८ धावांचे कठीण लक्ष्य ठेवले. त्यानंतर आॅस्टेÑलियाला सुरुवातीलाच धक्का देत पाकिस्तानने मालिका विजयाकडे मजबूत पाऊल टाकले.
तिसºया दिवसअखेर आॅस्ट्रेलियाने १ बाद ४७ धावा केल्या. त्यांना विजयासाठी अजून ४९१ धावांची गरज आहे. अॅरोन फिंच (२४*) व टीम हेड (१७*) खेळत आहेत. तत्पूर्वी, पाकने दुसरा डाव ९ बाद ४०० या धावसंख्येवर घोषित करीत आॅस्ट्रेलियासमोर विक्रमी लक्ष्य ठेवले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठे लक्ष्य गाठण्याचा विक्रम वेस्ट इंडीजच्या नावावर असून त्यांनी २००३ साली आॅस्ट्रेलियाविरुद्ध ७ बाद ४१८ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.
पाककडून बाबर आझमने १७१ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ९९ व कर्णधार सर्फराज अहमद याने १२३ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ८१ धावांची खेळी केली. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी १३३ धावांची भागीदारी केली. आॅसीकडून नॅथन लियोनने (४/१३५) चांगला मारा केला. पाकने गुरुवारी २ बाद १४४ धावसंख्येवरून खेळण्यास प्रारंभ केला होता. (वृत्तसंस्था)