कराची : पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू करण्याच्या मोहिमेच्या निमित्ताने विश्व एकादश संघ यजमान संघाविरुद्ध टी-२० मालिका खेळण्यासाठी सोमवारी लाहोरमध्ये पोहोचला.
संघाच्या आगमनासाठी अलामा इकबाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था होती. विश्व एकादशचे नेतृत्व दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यूप्लेसिस करीत आहे. लाहोरमध्ये दाखल झाल्यानंतर विश्व एकादशचे खेळाडू व अधिकाºयांना मॉल मार्गावर असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये नेण्यात आले. त्यावेळी त्या हॉटलकडे जाणाºया सर्व मार्गावरील वाहतूक रोखण्यात आली होती.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) व आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) यापूर्वीच विमानतळावर कुठलाही खेळाडू किंवा अधिकारी मीडियासोबत बोलणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
मार्च २००९ मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कुठल्याही संघाचा हा पहिलाच अधिकृत दौरा आहे. त्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्था आवश्यक होती.
हल्ल्यानंतर कुठलाही आघाडीचा कसोटी संघ सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये गेलेला नाही आणि आयसीसीने सामनाधिकारी आणि पंच मे २०१५ मध्ये लाहोरमध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी पाठवण्यास नकार दिला होता.
त्यामुळेच, पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पुनरागमनाच्या विश्व एकादश दौºयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. (वृत्तसंस्था)