Join us  

पृथ्वी शॉ याला अखेरच्या तीन वन-डेसाठी मिळू शकते संधी

मुंबई : कसोटी पदार्पणातच शतकी खेळी साकारणाऱ्या पृथ्वी शॉचे लवकरच प्रमोशन होणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने सर्वांना ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 6:02 AM

Open in App

मुंबई : कसोटी पदार्पणातच शतकी खेळी साकारणाऱ्या पृथ्वी शॉचे लवकरच प्रमोशन होणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने सर्वांना प्रभावित केले आणि त्याने मालिकावीराचा पुरस्कारही पटकावला. २१ आॅक्टोबरपासून सुरू होणाºया भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघात पृथ्वीला संधी मिळाली नसली तरी उर्वरित तीन सामन्यांत त्याचा समावेश होऊ शकतो. तसे झाल्यास तो उपकर्णधार रोहित शर्मासह सलामीला खेळू शकतो.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांची एक बैठक झाली. त्यात पुढील वर्षी होणाºया विश्वचषक स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता संघात सतत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘विश्वचषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून संघात खेळाडूंना रोटेट केले जाणार असून महत्त्वाच्या खेळाडूंना पुरेसा आराम मिळावा, हा यामागचा हेतू आहे. त्यामुळेच जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी यांना संघात आत-बाहेर केले जात आहे,’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

भारतीय एकदिवसीय संघात रोहित शर्मा आणि शिखर धवन ही सलामीची जोडी ठरलेली आहे. मात्र, त्यातही बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विंडीजविरुद्धच्या उर्वरित तीन एकदिवसीय सामन्यांसाठी शिखरला विश्रांती देऊन पृथ्वीला संधी मिळू शकते.