Join us  

 ‘नव्या दमाच्या खेळाडूंसाठी हीच संधी’- व्हीव्हीएस लक्ष्मण

india vs australia : सहा सत्रात भारताने ताठ मानेने वर्चस्व गाजवले पण अवघ्या ७० मिनिटात घात झाला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 1:47 AM

Open in App

ॲडिलेड मैदानावर भारतीय संघाच्या पतनावर मी काय बोलावे? पाठोपाठ गडी बाद होताना पाहणे कसेतरी वाटत होते. बाद होणारा  प्रत्येक फलंदाज आधीच्या फलंदाजाची ‘कॉपी’ करीत होता. आमची जितकी निराशा झाली तितकीच निराशा खेळाडू आणि संपूर्ण भारतीय पथकाची देखील झाली असावी.या पराभवामुळे जगातील अनेक भागात खेळण्याचा अनुभव असलेल्या भारतीय खेळाडूंची तुलना मात्र करता येणार नाही. तुम्ही कसे बाद झालात यापेक्षा तुम्ही बाद होणे टाळू शकला असता का, हे महत्वाचे मानतो. सहा सत्रात भारताने ताठ मानेने वर्चस्व गाजवले पण अवघ्या ७० मिनिटात घात झाला. पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड यांचा वेगवान मारा परतवून लावणे कुणालाही जमलेच नाही. पहिल्याच सामन्यात ही अवस्था झाली. अद्याप तीन सामने शिल्लक आहेत. अनुभवी खेळाडूंचा भरणा असताना इतकी दारुण अवस्था झाली. संघाची जडणघडण तसेच मानसिक कणखरतेची ही कसोटी आहे. यापुढे कर्णधार कोहली आणि मोहम्मद शमी देखील तुमच्यासोबत नसतील. अशावेळी नव्या दमाच्या खेळाडूंना चमक दाखवण्याची मोठी संधी असेल.ॲडिलेडची मरगळ झटकून पुढे आलेल्या संधीचे प्रत्येकाला सोने करावे लागेल.  ३६ धावात गारद झाल्यानंतर नव्याने सावरू शकत नाही,अशातला भाग नाहीच. त्यासाठी पहिल्या डावात किमान ३०० धावा उभारणे गरजेचे असेल. त्यासाठी चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या आणि तळाच्या फलंदाजांकडूनही योगदान अपेक्षित असेल. विदेशात तळाचे फलंदाज धावांची भर घालण्यात अपयशी ठरतात, ही परंपरा आहे. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध गचाळ क्षेत्ररक्षण आणि झेल सोडण्याची वृत्ती परवडणारी नाही. अनेकदा सराव केल्यानंतरही काही खेळाडूंमध्ये कौशल्याचा अभाव जाणवतो हे निराश करणारे आहे.आमचे वेगवान गोलंदाज अप्रतिम आहेतच. त्यातही उमेश यादव आणी रविचंद्रन अश्विन यांचे प्रयत्न दमदार होते. उमेशने यंदा स्पर्धात्मक क्रिकेट कमी खेळले होते.आयपीएलमध्येही बऱ्याच सामन्यात तो नव्हता. अश्विनची मात्र चेंंडूवर चांगली पकड आहे. त्यामुळे  पराभव विसरुन जा. कोचिंग स्टाफने संघातील प्रत्येक खेळाडूमध्ये उत्साहाचा संचार करण्याचे प्रयत्न करावेत. भारतीय संघ चवताळून पुढे येईल, याची खात्री वाटते. (गेमप्लान)

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया