Join us  

सलामीचं त्रांगड म्हणजे भिजत असलेलं घोंगडं, विराट कोहलीपुढे यक्षप्रश्न

कोहली आणि शास्त्री यांचा अहंकार गंभीरला संघापासून लांब ठेवण्यातच धन्यता मानेल.

By प्रसाद लाड | Published: December 19, 2018 3:33 PM

Open in App
ठळक मुद्देरवींद्र जडेजावर अन्याय का?भारताचे गोलंदाज फलंदाजी विसरले का?मोहम्मद शमीची चूक ती काय?

मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आहे. या पराभवाच्या मुख्य कारणांचा विचार केला तर आपली सलामी दोन्ही सामन्यांत चांगली झाली नसल्याचे समोर येते. आता तर पृथ्वी शॉ याला मायदेशी धाडले आहे. मयांक अगरवाल जरी संघात आला तरी त्याला तिसऱ्या सामन्यात संधी मिळेल, असे वाटत नाही. त्यामुळे भारतीय संघापुढे उभे ठाकलेले सलामीचे त्रांगडे अजूनही भिजत असलेल्या घोंगड्यासारखेच आहे.

ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना जिंकला. त्यांच्या या कामगिरीवर नजर टाकली तर त्यांच्या सलामीवीरांची कामगिरी ही नजरेत भरणारी नक्कीच आहे. कारण पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी 112 धावा केल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी 59 धावा केल्या. दुसरीकडे भारताच्या सलामीवीरांनी दोन्ही डावांत मिळून फक्त 22 धावा केल्या. पहिल्या डावात लोकेश राहुलला दोन धावा करता आल्या, तर मुरली विजयला भोपळाही फोडता आला नाही. दुसऱ्या डावात मुरली विजयने 20 धावा केल्या तर राहुल शून्यावर बाद झाला. भारताच्या पराभवाचे मुख्य कारण हे सलामीवीर आहे, हे आता मान्य करायला हवं. पृथ्वी शॉ आणि रोहित शर्मा हे दोघेही मायदेशी परतले आहेत. त्यामुळे भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात या दोन्ही सलामीवीरांवर विसंबून राहणार, असेच दिसत आहे.

कर्णधार कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडे सलामीचा गुंता सोडवण्याचे बरेच उपाय आहेत. पण हे उपाय ते करतील तर शपथ. सर्वात पहिला उपाय म्हणजे त्यांनी रिषभ पंतला मयांक अगरवालबरोबर सलामीला आणावे. त्याचबरोबर दोन्ही सलामीवीरांना संघातून डच्चू द्यावा. दोन जागा रीकामी होतील, त्यामध्ये रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या यांना संधी द्यावी. असे केल्यास संघाला दोन नवीन सलामीवीर मिळतील. त्याचबरोबर संघात तीन अष्टपैलू खेळाडू येतील. संघाच्या फलंदाजीबरोबरच गोलंदाजीही भक्कम होण्यास मदत होईल.

एका पर्यायाचा विचार बुरसट मानसीकतेची चौकट मोडून करायला हवा. गौतम गंभीरने निवृत्ती घेतली असली तरी त्याचा विचार आगामी दोन कसोटी सामन्यांसाठी करायला हरकत नाही. गंभीर फीट आहे. त्याचबरोबर चांगल्या फॉर्मात आहे. आपल्या अखेरच्या सामन्यात त्याने शतक झळकावले होते. त्यामुळे आता जर त्याला संधी दिली तर नक्कीच रक्ताचे पाणी करून तो मैदानात उभा राहील. गंभीरकडे अनुभव आहे, तंत्र आहे. आणि असा सलामीवीर सध्याच्या घडीला तरी दिसत नाही. त्यामुळे हा पर्याय संघासाठी योग्य ठरू शकतो. पण कोहली आणि शास्त्री यांचा अहंकार गंभीरला संघापासून लांब ठेवण्यातच धन्यता मानेल. कारण सध्याच्या घडीला या दोघांची संघावर हुकुमत आहे. अनुभवी खेळाडू आला तर त्याचेही ऐकून घ्यावे लागेल, असे या दोघांना वाटत असेल. पण संघातील वातावरणापेक्षा मैदानावरील कामगिरी महत्वाची नाही का, हा विचार कोहली आणि शास्त्री या जोडीने करायला हवा.

ऑस्ट्रेलियामध्ये भारताची रणनीती आतापर्यंत चुकत आली आहे. राहुल आणि मुरली यांच्यापैकी एकाला वगळून रोहित किंवा पंतला सलामीला पाठवायला हवं होतं. त्यामुळे संघात एक जागा तयार झाली असती आणि त्यावेळी एक अतिरीक्त अष्टपैलू खेळाडू संघात आला असता. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात तरी भारतीय संघात काही बदल पाहायला मिळतील, अशी आशा आपण व्यक्त करू शकतो.

रवींद्र जडेजावर अन्याय का?जडेजासारखा गुणी अष्टपैलू खेळाडू संघात आहेत. पण त्याच्यावर कोहली आणि शास्त्री कोणता राग काढत आहेत, देव जाणे. तो महेंद्रसिंग धोनीचा लाडका खेळाडू आहे, हा त्याचा दोष आहे का? इंग्लंडच्या दौऱ्यातही त्याच्यावर अन्याय केला. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातही तीच गोष्ट सुरु आहे.

चार गोलंदाज खेळवण्याचा घाट कशासाठी?पर्थच्या खेळपट्टीवर भारताने कोणता विचार करून चार गोलंदाज खेळवले, हे अनाकलनीय आहे. कारण हा सामना पर्थच्या वाका खेळपट्टीवर खेळवला गेला नव्हता. हा सामना नवीन खेळपट्टीवर खेळवला गेला. पण वाकाच्या खेळपट्टीचे भूत भारतीय मानसीकतेवर कायम होते. त्यामुळे त्यांनी चार गोलंदाज खेळवण्याचा जुगार खेळला आणि त्यामध्ये भारतीय संघाचे मोठे नुकसान झाले.

भारताचे वेगवान गोलंदाज फलंदाजी विसरले का?भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात चार वेगवान गोलंदाज खेळवले. पण या चौघांनी किती धावा केल्या, हे पाहणेही महत्वाचे आहे. कारण ऑस्ट्रेलियाच्या चार गोलंदाजांनी पहिल्या डावात 34 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात त्यांनी 37 धावांची भर घातली. 198 ते 243 धावांचा प्रवास या चार गोलंदाजांनी करून दिली. दुसरीकडे भारताच्या चार गोलंदाजांनी फक्त 11 धावा केल्या. हे गणित पाहिले तर ऑस्ट्रेलियाचा संघ हा सामना का जिंकला, हे समजू शकेल.

मोहम्मद शमीची चूक ती काय?शमी हा सध्याच्या घडीला भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज आहे. शमी वेगवान गोलंदाजी करतो. त्याचबरोबर तो दोन्ही स्विंगही करू शकतो. त्यामुळे जेव्हा चेंडू नवीन असतो, तेव्हा तो पहिल्यांदा शमीच्या हातात सुपूर्द करायला हवा. इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांच्यापेक्षा शमीला नवीन चेंडूसाठी प्रधान्य द्यायला हवे. पण कोहली शमीवर का विश्वास ठेवत नाही, हेदेखील अनाकलनीय आहे.

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीरवी शास्त्री