Join us  

ज्याच्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केलं, त्या गेलनं करून दाखवलं...

ख्रिस गेल... क्रिकेट विश्वातला एक धडाकेबाज फलंदाज. पण यंदाच्या आयपीएलच्या लिलावात त्याला कुणीही वाली ठरला नव्हता. त्याच्याकडे सर्वांनी दुर्लक्षंच केलं होतं. पण त्याच दुर्लक्षित गेलनं गुरुवारी देदिप्यमान कामिगरी करून दाखवली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 3:50 AM

Open in App

मुंबई : ख्रिस गेल... क्रिकेट विश्वातला एक धडाकेबाज फलंदाज. पण यंदाच्या आयपीएलच्या लिलावात त्याला कुणीही वाली ठरला नव्हता. त्याच्याकडे सर्वांनी दुर्लक्षंच केलं होतं. पण त्याच दुर्लक्षित गेलनं गुरुवारी देदिप्यमान कामिगरी करून दाखवली. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावत, आपण अजून संपलेलो नाही, हे गेलनं क्रिकेट विश्वाला दाखवून दिलं. या हंगामातील गेलचे हे पहिले शतक ठरले.

गेल, आता संपला असं म्हणत बऱ्याच जणांनी आयपीएलच्या लिलावाच्या वेळी नाकं मुरडली होती. त्यामुळे यंदाच्या लिलावात त्याला कुणीही आपलंस केलं नव्हतं. तो या आयपीएलमध्ये खेळणार नाही, असं वाटायला लागलं होतं. अखेरच्या टप्प्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने त्याला मूळ किंमतीत आपल्या संघात स्थान दिलं आणि तोच गेल त्यांच्यासाठी सर्वात मोलाचा खेळाडू ठरताना दिसत आहे.

गेल येतो, मोठे फटके मारतो आणि आपल काम संपवीन तंबूत परत जातो, असं त्याच्याबद्दल नेहमीच बोलले जायचे. पण या सामन्यात मात्र आपण पूर्ण 20 षटकेही खेळू शकतो, हे त्याने दाखवून दिलं. गेलची ही खेळी फारच निराळी होती. त्याने काही वेळा बॅट म्यान केली. तर काही वेळा आपल्या फटक्यांना मुरड घातली. जे चेंडू बॅटवर आले त्यांना सीमारेषे पार धाडले. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात गेलने 63 चेंडूंत नाबाद 104 धावांची दमदार खेळी साकारली.

टॅग्स :आयपीएल 2018क्रिकेट