Join us  

पुन्हा एकदा तळाचे फलंदाज भारतासाठी ठरले डोकेदुखी

ऑस्ट्रेलियाचा ३ गड्यांनी विजय : जसप्रीत बुमराहचा अचूक मारा ठरला व्यर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 6:24 AM

Open in App

विशाखापट्टणम : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाने रोमहर्षक विजय मिळवताना पहिल्या टी२० सामन्यात यजमान भारताचा ३ गड्यांनी पराभव केला. यासह दोन टी२० सामन्यांच्या मालिकेत कांगारुंनी १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. ग्लेन मॅक्सवेलने (५६) केलेल्या शानदार खेळीनंतर पॅट कमिन्स (७*) आणि झाय रिचर्डसन (७*) या तळाच्या फलंदाजांनी केलेल्या चिवट फलंदाजीच्या जोरावर आॅसी संघाने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला.

एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियान कर्णधार अ‍ॅरोन फिंचने यजमान भारताला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. मधली फळी कोलमडल्यामुळे सलामीवीर लोकेश राहुलच्या (५०) आक्रमक अर्धशतकानंतरही भारताने २० षटकात ७ बाद १२६ धावांची मर्यादित मजल मारली. मात्र ही धावसंख्या गाठताना ऑस्ट्रेलियाचाही घाम निघाला. मार्कस स्टोइनिस (१), कर्णधार अ‍ॅरोन फिंच (०) यांना झटपट बाद करुन भारताने पकड मिळवली. परंतु, मॅक्सवेलने सलामीवीर डी’अ‍ॅर्सी शॉर्टसह ८४ धावांची भागीदारी करत भारतावर दडपण आणले.

युझवेंद्र चहलने मॅक्सवेलचा बहुमुल्य बळी मिळवत भारताला पुनरागमन करुन दिले. मॅक्सवेलने ४३ चेंडूत ६ चौकार व २ षटकारांसह ५६ धावा चोपल्या. शॉर्टही (३७) धावबाद झाल्याने भारताच्या आशा उंचावल्या. यानंतर ठराविक अंतराने कांगारुंना धक्के देत भारताने सामना आपल्या बाजूने झुकविला. जसप्रीत बुमराहने १९व्या षटकात टिच्चून मारा करत २ बळी घेतले. याआधी त्याने कर्णधार फिंचला भोपळाही फोडू दिला नव्हता. अखेरच्या षटकात १४ धावांची गरज असताना कमिन्स व रिचर्डसन यांनी आॅसीला विजयी केले. पाचव्या चेंडूवर यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात उमेश यादवने फुलटॉस चेंडू टाकला आणि यावर कमिन्सने चौकार मारला. हाच सामन्यातील निर्णायक क्षण ठरला.

तत्पूर्वी, खराब फॉर्मशी झगडत असलेल्या लोकेश राहुलने आक्रमक अर्धशतक झळकावले. मात्र, मधली फळी अपयशी ठरल्याने भारताला मर्यादित मजल मारता आली. राहुलने ३६ चेंडूत ६ चौकार व एका षटकारासह ५० धावा काढल्या. याशिवाय विराट कोहली (१७ चेंडूत २४ धावा) व महेंद्रसिंग धोनी (३७ चेंडूत २९) यांनी मोलाचे योगदान दिले.

या तिघांचा अपवाद वगळता भारताच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

रोहित शर्मा (५), पंत (३), दिनेश कार्तिक (१) आणि कृणाल पांड्या (१) अपयशी ठरल्याने भारताला फटका बसला. धोनीच्या संयमी खेळीमुळे भारताला समाधानकारक मजल मारता आली. रोहित शर्मा झटपट परतल्यानंतर राहुल-कोहली यांनी ५५ धावांची भागीदारी केली. राहुलच्या फटकेबाजीपुढे कोहलीही प्रेक्षकाच्या भूमिकेत गेला होता. संधी मिळताच कोहलीनेही दणका दिल्याने भारताचा धावफलक वेगाने हलत होता. या दोघांच्या जोरावर भारत १८०च्या आसपास धावा उभारणार असे दिसत होते. परंतु, फिरकीपटू अ‍ॅडम झम्पाला आक्रमक फटका मारण्याच्या नादात कोहली बाद झाला. येथूनच भारतीय फलंदाजीला गळती लागली.ऑस्ट्रेलियाकडून नॅथन कुल्टर-नाइल याने २६ धावांत ३ महत्त्वपूर्ण बळी घेत भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. याशिवाय बेहरेनडॉर्फ, झम्पा व पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी एक बळी घेत भारतीयांना रोखले. (वृत्तसंस्था)धावफलकभारत : रोहित शर्मा झे. झम्पा गो. बेहरेनडॉर्फ ५, लोकेश राहुल झे. फिंच गो. कुल्टर-नाइल ५०, विराट कोहली झे. कुल्टर-नाइल गो. झम्पा २४, रिषभ पंत धावबाद (बेहरेनडॉर्फ-हँड्सकॉम्ब) ३, महेंद्रसिंग धोनी नाबाद २९, दिनेश कार्तिक त्रि. गो. कुल्टर-नाइल १, कृणाल पांड्या झे. मॅक्सवेल गो. कुल्टर-नाइल १, उमेश यादव पायचीत गो. कमिन्स २, युझवेंद्र चहल नाबाद ०. अवांतर - ११. एकूण : २० षटकात ७ बाद १२६ धावा. बाद क्रम : १-१४, २-६९, ३-८०, ४-९२, ५-९४, ६-१००, ७-१०९.गोलंदाजी : जेसन बेहरेनडॉर्फ ३-०-१६-१; झाय रिचर्डसन ४-०-३१-०; नॅथन कुल्टर-नाइल ४-०-२६-३; अ‍ॅडम झम्पा ३-०-२२-१; पॅट कमिन्स ४-०-१९-१; डी’अ‍ॅर्सी शॉर्ट २-०-१०-०.ऑस्ट्रेलिया : डी’अ‍ॅर्सी शॉर्ट धावबाद (कृणाल-धोनी) ३७, मार्कस स्टोइनिस धावबाद (उमेश-चहल) १; अ‍ॅरोन फिंच पायचीत गो. बुमराह ०, ग्लेन मॅक्सवेल झे. राहुल गो. चहल ५६, पीटर हँड्सकॉम्ब झे. धोनी गो. बुमराह १३, अ‍ॅश्टन टर्नर त्रि. गो. कृणाल ०, नॅथन कुल्टर-नाइल त्रि. गो. बुमराह ४, पॅट कमिन्स नाबाद ७, झाय रिचर्डसन नाबाद ७. अवांतर - २. एकूण : २० षटकात ७ बाद १२७ धावा. बाद क्रम : १-५, २-५, ३-८९, ४-१०१, ५-१०२, ६-११३, ७-११३.गोलंदाजी : जसप्रीत बुमराह ४-०-१६-३; युझवेंद्र चहल ४-०-२८-१; उमेश यादव ४-०-३५-०; कृणाल पांड्या ४-०-१७-१; मयांक मार्कंडेय ४-०-३१-०.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया