भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना ( Suresh Raina) मंगळवारी चुकीच्या कारणानं चर्चेत आला. मुंबई विमानतळाजवळ असलेल्या ड्रॅगन फ्लाय क्लबवर मध्यरात्री पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सुरेश रैनावर गुन्हा दाखल केला आहे. आयपीसीच्या कलम १८८, २६९, ३४ आणि एनएमडीएच्या काही कलमांतर्गत पोलिसांनी एकूण ३४ जणांविरोधात गुन्ह्यांची नोंद केली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन न केल्यानं ही कारवाई केली गेली आहे.मुंबई पोलिसांनी रात्री साडे तीनच्या सुमारास विमानतळाजवळ असलेल्या ड्रॅगन फ्लाय क्लबवर छापा टाकला. त्यावेळी तिथे पार्टी सुरू होती.
या पार्टीला क्रिकेटपटू रैनासह गायक गुरु रंधावा, अभिनेता ऋतिक रोशनची माजी पत्नी सुझॅन आणि इतरही काही सेलिब्रिटी उपस्थित असल्याचं समजतं. पोलिसांनी या प्रकरणी ३४ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये २७ ग्राहक आणि ४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
मुंबईत लॉकडाऊनचे नियम लागू आहेत. त्यामुळे रात्री ११ नंतर कोणत्याही प्रकारच्या पार्टीचं आयोजन करण्यास बंदी आहे. मात्र ११ नंतरही ड्रॅगन फ्लाय क्लबमध्ये पार्टी सुरू होती. त्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या २७ ग्राहकांपैकी १९ जण दिल्लीहून आले आहेत. तर अन्य ग्राहक पंजाब आणि दक्षिण मुंबईचे रहिवासी आहेत. यापैकी बहुतांश जणांनी मद्यपान केलं होतं.
या घटनेनंतर सुरेश रैनाच्या व्यवस्थापकीय टीमनं एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं. त्यात त्यांनी म्हटलं की,''सुरेश रैना मुंबईत एका शूटसाठी गेला होता आणि ती संपण्यास विलंब झाला. त्यानंतर एका मित्रानं रैनाला डिनरसाठी निमंत्रण दिले आणि तेथूनच तो दिल्लीचं विमान पकडण्यासाठी जाणार होता. त्याला मुंबईतील वेळेबाबतच्या नियमांची माहिती नव्हती. याबाबत पोलिसांनी माहिती देताच, रैनानं त्वरित आपली चूक मान्य केली. ही चूक जाणीवपूर्वक केली नाही. तो नेहमी नियमांचे पालन करतो. भविष्यातही तो नियमांचे पालन करत राहणार.''