Join us  

नव्या चेंडूवर झटपट बळी घेण्याची गरज

इंग्लंडमधील खडतर कसोटी दौऱ्यानंतर टीम इंडियाला वन डे प्रकाराशी एकरूप होण्याचे साधर्म्य साधायचे आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 1:45 AM

Open in App

- व्हीव्हीएस लक्ष्मण लिहितात..इंग्लंडमधील खडतर कसोटी दौऱ्यानंतर टीम इंडियाला वन डे प्रकाराशी एकरूप होण्याचे साधर्म्य साधायचे आहे. पुढील वर्षीच्या विश्वचषकाची तयारी या नात्याने आशिया चषक महत्त्वपूर्ण स्पर्धा ठरावी. विराटच्या अनुपस्थितीत अन्य सहका-यांच्या गुणवत्तेची येथे कसोटी लागणार आहे. भारत हाँगकाँगविरुद्ध बॅकफूटवर आला होता. अंशुमान रथ आणि निझाकत यांच्या सलामी झंझावाताने अनुभवी खेळाडूंना घाम फोडला. मधल्या फळीला अनुभव असता तर क्रिकेटमधील एका मोठ्या ‘अपसेट’ची नोंद होऊ शकली असती. पण भारतीय गोलंदाजांनी अखेर त्यांना रोखलेच.हाँगकाँगविरुद्ध सामन्यातून धडा घेण्यासारखी बाब म्हणजे नव्या चेंडूवर झटपट गडी बाद करणे गरजेचे आहे. याशिवाय मधल्या फळीने धावसंख्येला आकार देण्यासाठी स्थिरावून खेळायला हवे. गेल्या २४ तासांत भारतीय संघाची दोन रूपे दिसली. पाकविरुद्ध भारत फलंदाजी-गोलंदाजीत भक्कम जाणवला. जखमेतून सावरल्यानंतर परतलेला भूवनेश्वर हाँगकाँगविरुद्ध चाचपडला तर पाकविरुद्ध धमाकेदार मारा करण्यात यशस्वी ठरला. फखर झमान आणि इमाम उल हक यांना भूवीने ताबडतोब माघारी पाठवून सामन्यावर पकड मजबूत केली.शिखर धवनला धावा काढताना पाहून आनंद झाला. गेल्या काही वर्षांपासून शिखर, रोहित आणि विराट या पहिल्या तिन्ही फलंदाजांनी धावात नेहमी भर घालण्याचेच काम केले. नियमित कर्णधाराच्या अनुपस्थितीत रोहितने नेतृत्वाची तसेच सलामीवीराची जबाबदारी पार पाडली. शिखरने पहिल्या दिवशी ठोकलेल्या शतकाची पुनरावृत्ती केली नसेल पण पाकच्या गोलंदाजांवर तो हावी होता. दोन्ही सामन्यातील अंबाती रायुडूच्या खेळावर मी फार प्रभावित आहे. त्याने किती धावा काढल्या, हा विषय गौण आहे. ज्या आत्मविश्वासाने तो खेळला, तेपाहून मधल्या फळीत समन्वय साधण्यासाठी भविष्यात त्याच्यासारख्या खेळाडूंची गरज असल्याचा प्रत्यय आला.पाकविरुद्ध खेळताना भारताचा विश्वास आणि आक्रमकता पाहण्यासारखी होती. लागोपाठ दोन सामने खेळताना व्यावसायिक संघांनी थकवा, फिटनेस याविषयी फारसे बोलायचे नसते. भारताने हेच केले. व्यावसायिकतेच्या जोरावर पाकवर सर्व आघाड्यांवर सामन्यात वर्चस्व गाजविले. बदली क्षेत्ररक्षक म्हणून आलेल्या मनीष पांडेने सीमारेषेवर घेतलेला अप्रतिमझेल पाहून पहिल्या ११ खेळाडूंशिवाय राखीव बाकांवरील खेळाडूंमध्ये विजयाची भूक आहे, याची मला खात्री पटली.