Join us  

यंदाच्या मोसमातील मुंबईचा पहिला विजय,यजमान ओडिशाचा पराभव

गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर बलाढ्य मुंबईने यंदाच्या रणजी स्पर्धेतील पहिला विजय मिळविताना ओडिशाचा १२० धावांनी पराभव केला. ४१३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ओडिशाचा डाव २९२ धावांमध्ये गुंडाळून मुंबईकरांनी बाजी मारली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 4:35 AM

Open in App

मुंबई : गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर बलाढ्य मुंबईने यंदाच्या रणजी स्पर्धेतील पहिला विजय मिळविताना ओडिशाचा १२० धावांनी पराभव केला. ४१३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ओडिशाचा डाव २९२ धावांमध्ये गुंडाळून मुंबईकरांनी बाजी मारली. दुसºया डावात मोक्याच्या वेळी सिद्धेश लाडने झळकावलेले शतक मुंबईच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरले. पहिल्या डावात मोक्याच्या वेळी शतक ठोकून मुंबईला सावरणाºया युवा पृथ्वी शॉ याला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.भुवनेश्वर येथील केआयआयटी मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी मिळाल्यानंतर २८९ धावांची मजल मारली. यानंतर, यजमानांचा डाव १४५ धावांत गुंडाळून मुंबईने १४४ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. दुसºया डावात मात्र, मुंबईचा डाव ६ बाद ८५ धावा असा अडचणीत असताना, सिद्धेशने १५३ चेंडंूत ११७ धावांची निर्णायक खेळी केली आणि मुंबईने आपला दुसरा डाव ९ बाद २६८ धावांवर घोषित करून ओडिशाला विजयासाठी ४१३ धावांचे कठीण आव्हान दिले.तिसºयाच दिवशी मुंबईने यजमानांची ४ बाद ९३ धावा अशी अवस्था करून आपला विजय निश्चित केला होता. दुसºया डावात ओडिशाला सुरुवातीलाच धक्का देत, मुंबईकरांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. धवल कुलकर्णी, शार्दूल ठाकूर आणि आकाश पारकर यांनी भेदक मारा करत यजमानांची केविलवाणी अवस्था केली होती. ४ बाद ९३ धावसंख्येवरून चौथ्या दिवसाची सुरुवात करणाºया ओडिशाचे उर्वरित फलंदाज पुढील १९९ धावांत बाद झाले. धवल कुलकर्णी आणि आकाश पारकर यांनी प्रत्येकी ३ बळी, तर अभिषेक नायरने २ बळी घेतले. ओडिशाकडून कर्णधार गोविंदा पोद्दार याने सर्वाधिक १२३ चेंडूंत ८७ धावांची खेळी करत संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. मधल्या फळीतील शांतनू मिश्रानेही (४९) चांगली फलंदाजी केली.संक्षिप्त धावफलक :- मुंबई (पहिला डाव) : ९९.५ षटकांत सर्व बाद २८९ धावा.- ओडिशा (पहिला डाव) : ५०.५ षटकांत सर्व बाद १४५ धावा.- मुंबई (दुसरा डाव) : ७१ षटकांत ९ बाद २६८ धावा (घोषित).- ओडिशा (दुसरा डाव) : ८५.१ षटकांत सर्व बाद २९२ धावा (गोविंदा पोद्दार ८७, शांतनू मिश्रा ४९; आकाश पारकर ३/४०, धवल कुलकर्णी ३/७४; अभिषेक नायर २/३५.)आता ऐतिहासिक सामना...या विजयासह ‘क’ गटामध्ये १० गुणांसह तिसºया स्थानी झेप घेतलेल्या मुंबईचा पुढील सामना बडोदाविरुद्ध घरच्या मैदानावर ९ ते १२ नोव्हेंबरदरम्यान खेळविण्यात येईल. दखल घेण्यासारखी बाब म्हणजे, बडोद्याविरुद्ध होणारा सामना हा मुंबईचा ५००वा रणजी सामना असल्याने, या लढतीला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.

टॅग्स :क्रिकेट