Join us  

वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स ठरले ‘किंग’

पोलार्डचा झंझवात : अखेरच्या चेंडूवर यजमानांनी पंजाबला नमवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 7:02 AM

Open in App

मुंबई : श्वास रोखून धरायला लावलेल्या समान्यात अल्झारी जोसेफने अखेरच्या चेंडूवर २ धावा घेत मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध थरारक विजय मिळवून दिला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १९७ धावांचा डोंगर उभारल्यानंतर मुंबईने ३ गड्यांनी बाजी मारताना २० षटकात ७ बाद १९८ धावा केल्या. कर्णधार किएरॉन पोलार्ड याने अवघ्या ३१ धावांत ३ चौकार व १० षटकारांसह दिलेला ८३ धावांचा तडाखा सामन्यात निर्णायक ठरला.

वानखेडे स्टेडियमवर दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये उतरलेल्या मुंबईचे नेतृत्त्व पोलार्डने केले. त्याने शानदार नेतृत्त्व करताना कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात मुंबईला थरारक विजय मिळवून दिला. आयपीएल पदार्पण करणाऱ्या सिध्देश लाड (१५) व क्विंटन डीकॉक (२४) यांनी मुंबईला आक्रमक सुरुवात करुन दिली. मात्र पंजाबने ठराविक अंतराने बळी मिळवताना मुंबईची १२व्या षटकात ४ बाद ९६ धावा अशी अवस्था केली. येथून सर्व सूत्रे पोलार्डने आपल्याकडे घेतली आणि झंझावाती फटकेबाजी करताना मुंबईचा विजय साकारला. अल्झारी याने मोक्याच्यावेळी १३ चेंडूतनाबाद १५ धावा करुन मुंबईच्या विजयावर शिक्का मारला.

तत्पूर्वी सलामीवीर लोकेश राहुलचे नाबाद शतक व ख्रिस गेलचे तुफानी अर्धशतक या जोरावर पंजाबने धावांचा डोंगर उभारला. राहुलने ६४ चेंडूत ६ चौकार व ६ षटकारांसह नाबाद १०० धावांचा तडाखा दिला. गेलने ३६ चेंडूत ३ चौकार व ७ षटकारांचा वर्षाव करताना ६३ धावा कुटल्या. नाणेफेक जिंकून पोलार्डने पाहुण्यांना प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. खेळपट्टीचा अंदाज घेतल्यानंतर गेलने पाचव्या षटकापासून दांडपट्टा फिरविण्यास सुरुवात केली. दोघांनी ७७ चेंडूत ११६ धावांची सलामी देत मुंबईकरांना जबरदस्त चोप दिला.बेहरेनडॉर्फने गेलला बाद करुन ही जोडी फोडली. यानंतर पुनरागमन केलेल्या मुंबईकरांनी मधल्या फळीला हादरे देत पंजाबवर दडपण आणले. मात्र, अखेरपर्यंत टिकलेल्या राहुलने चौफेर फटकेबाजी करत पंजाबला मजबूत धावसंख्या उभारुन दिली.
संक्षिप्त धावफलक :किंग्स इलेव्हन पंजाब : २० षटकात ४ बाद १९७ धावा (लोकेश राहुल नाबाद १००, ख्रिस गेल ६३; हार्दिक पांड्या २/५७) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : २० षटकात ७ बाद १९८ धावा (किएरॉन पोलार्ड ८३, क्विंटन डीकॉक २४; मोहम्मद शमी ३/२१.)
मुंबईचा ‘संकटमोचक’सिद्धेश लाडचे पदार्पणआतापर्यंत मुंबईच्या रणजी संघासाठी तारणहार ठरलेल्या सिद्धेश लाडला बुधवारी मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. सामन्यापूर्वी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने सिद्धेशला संघाची कॅप दिली. मंगळवारी सराव सत्रादरम्यान रोहितला दुखापत झाली. उजव्या पायाचे स्नायू दुखावल्याने रोहितला विश्रांती देण्याचे संघ व्यवस्थापनाने ठरविले. रोहित दुखापतीतून सावरला असून कोणताही धोका न पत्करण्याच्या उद्देशाने त्याला पंजाबविरुद्ध विश्रांती देण्याचे ठरल्याची माहिती मुंबई संघ व्यवस्थापनाने दिली. त्याच्या जागी सिद्धेशची संघात वर्णी लागली. विशेष म्हणजे गेल्या ११ वर्षांत सलग १३३ आयपीएल सामने खेळलेला रोहित पहिल्यांदा संघाबाहेर बसला.

टॅग्स :आयपीएल 2019