Join us

महेंद्रसिंह धोनीच्या सल्ल्यामुळेच श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळाला - भुवनेश्वर कुमार

‘महेंद्रसिंह धोनीने मला कसोटीप्रमाणे सबुरीने खेळत राहण्याचा सल्ला दिला होता. अनेक षटकांचा खेळ शिल्लक असल्याने दडपण न घेता खेळत राहा. सहजपणे खेळल्याने लक्ष्य गाठणे कठीण नाही, असे आम्हाला माहिती होते.’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:13 IST

Open in App

पल्लीकल : ‘महेंद्रसिंह धोनीने मला कसोटीप्रमाणे सबुरीने खेळत राहण्याचा सल्ला दिला होता. अनेक षटकांचा खेळ शिल्लक असल्याने दडपण न घेता खेळत राहा. सहजपणे खेळल्याने लक्ष्य गाठणे कठीण नाही, असे आम्हाला माहिती होते.’ श्रीलंकेविरुद्ध दुस-या वन डेत पराभवाच्या खाईतून संघाला बाहेर काढून विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजाविणा-या भुवनेश्वर कुमारने ही प्रतिक्रिया व्यक्त केली.माजी कर्णधार धोनीसमवेत आठव्या गड्यासाठी १०० धावांची भागीदारी करणाºया भुवीने ५३ धावा ठोकल्या. भारताने हा सामना तीन गडी राखून जिंकला. सामन्यानंतर भुवी म्हणाला,‘आम्ही सात गडी आधीच गमविल्याने त्या परिस्थितीत आणखी गमविण्यासारखे काहीही नव्हते. मी धोनीची शक्य तितकी मदत करण्याचे ठरविले. सुरुवातीला रोहित आणि शिखरने ठोस सुरुवात करून दिल्यानंतरही मधली फळी अचानक कोसळताच संघावर दडपण आले होते. जितके शक्य होईल क्रिझवर थांबायला हवे, असा मी निर्णय घेतला. धोनीचाही हाच सल्ला होता. स्थिरावून खेळल्यास विजय मिळेलच याची खात्री होती.’धनंजया डिसिल्व्हाचा सामना कसा केला हे विचारताच भुवी म्हणाला,‘तो आॅफस्पिनर असून लीगस्पिन आणि गुगली मारा करीत होता. मी त्याच्या खराब चेंडूंची प्रतीक्षा करीत राहिलो. बाहेर जाणाºया चेंडूवर फटके मारण्यात अडसर नव्हता. त्याने गुगलीवर सर्व गडी बाद केल्याने मी डावपेचानुसार गुगली चेंडू टाळले. सुरुवातीला अडचण आली पण लगेचच सावरल्याने धोनी व मी खेळपट्टीवर वेगवान धावा घेतल्या. आम्हा दोघांना प्रत्येकी एकदा जीवदान मिळाल्याचा पुढे लाभ झाला.’ आम्ही एकेरी आणि दुहेरी धावा घेण्याची एकही संधी सोडली नाही. मोठी फटकेबाजी करण्याची गरजही भासली नाही. कसोटी सामन्यासारखा स्वाभाविक खेळ करीत आम्ही सामना खेचून आणला. याचे श्रेय काही प्रमाणात संजय बांगर यांना जाते. त्यांनी माझ्यावर फार मेहनत घेतली असल्याचे भुवनेश्वरने सांगितले.(वृत्तसंस्था)

टॅग्स :क्रिकेट