दुबई : २०१९च्या आयसीसी क्रिकेट वन डे विश्वचषकाची पात्रता गाठण्यात श्रीलंका संघ अपयशी ठरला. पात्रता गाठण्यासाठी भारताविरुद्ध किमान दोन वन डेत विजयाची संघाला गरज होती.
१९९६ चा विश्वविजेता असलेला श्रीलंका संघ सध्या पाच सामन्यांच्या मालिकेत ०-४ ने माघारला आहे. मालिकेत दोन विजय मिळाल्यास या संघाला ५० षटकांच्या विश्वचषकात थेट प्रवेश मिळाला असता. ३० मे ते १५ जुलै या कालावधीत इंग्लंडमध्ये विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. इंग्लंडशिवाय वन डे रँकिंगमध्ये पहिल्या सात स्थानांवर असलेले संघ ३० सप्टेंबरच्या मर्यादेपर्यंत विश्वचषकासाठी थेट पात्र ठरले आहेत. भारताने मालिकेत ४-० अशी भक्कम आघाडी मिळवली असून लंकेला प्रवेशासाठी वेस्ट इंडिजच्या कामगिरीवर विसंबून रहावे लागेल. श्रीलंकेने रविवारी भारताविरुद्ध अखेरच्या सामन्यात विजय मिळविल्यास त्यांचे ८८ गुण होतील. तरीही पात्रता गाठता येणार नाही.
वेस्ट इंडिजचे देखील ८८ गुण आहेत. विंडीजला १३ सप्टेंबर रोजी आयर्लंडविरुद्ध एक आणि त्यानंतर १९ सप्टेंबरपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळायची आहे. श्रीलंका संघ भारताकडून ५-० ने हरल्यास वेस्ट इंडिजने आयर्लंडवर विजय मिळविणे आवश्यक राहील. याशिवाय इंग्लंडविरुद्ध किमान चार सामन्यात विंडीजला विजय मिळवावा लागेल. ज्या संघांना थेट प्रवेश मिळत नाही त्यांना पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत स्थान मिळवावे लागते. पात्रता फेरीत रँकिंगमध्ये तळाच्या स्थानावर असलेले चार, विश्व क्रिकेट लीग चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थानावर असलेले चार आणि विश्व क्रिकेट लीगमधील आघाडीचे दोन असे एकूण दहा संघ खेळतात. (वृत्तसंस्था)