Join us  

नाइट रायडर्स ढेपाळले

चेन्नईला १०९ धावांचे माफक आव्हान : चहर, ताहिर यांचा भेदक मारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 7:03 AM

Open in App

चेन्नई : मध्यमगती गोलंदाज दीपक चहर याने भेदक मारा करत बलाढ्य कोलकाता नाइट रायडर्सची आघाडीची फळी उध्वस्त केली. त्याच्या भेदकतेच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्सने पहिल्या षटकापासून वर्चस्व मिळवताना कोलकाताला २० षटकात ९ बाद १०८ धावा असे रोखले. आंद्रे रसेलने ४४ चेंडूत ५ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५० धावा केल्याने कोलकाताला शंभरी पार करता आली.

एम. चिदंबरम स्टेडियमवर नाणेफेक जिंकून सीएसके कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने कोलकाताला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. दीपकने आपल्या कर्णधाराचा निर्णय अचूक ठरविताना ख्रिस लीन (०), रॉबिन उथप्पा (११) आणि नितिश राणा (०) या प्रमुख फलंदाजांना स्वस्तामध्ये तंबूचा रस्ता दाखवला. अनुभवी हरभजन सिंग याने सुनील नरेन (६) व इम्रान ताहिरने दिनेश कार्तिक (१९), शुभमान गिल (९) यांना बाद करुन कोलकाताची कोंडी केली.सुनील नरेनचा अप्रतिम झेल घेत दीपकने उच्च दर्जाच्या क्षेत्ररक्षणाचेही प्रदर्शन केले. चेन्नईच्या गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांकडून मिळालेल्या शानदार सहकार्यामुळे कोलकाताची अवस्था अत्यंत बिकट झाली.

कोलकाताचे फलंदाज एकामागून एक हजेरी लावून परतल्याने पुढील फलंदाज कमालीचे दडपणाखाली आले. मात्र एकट्या रसेलने संघाची पडझड रोखण्याचा प्रयत्न करताना झुंजार नाबाद अर्धशतक झळकावले. मात्र त्याला अपेक्षित साथ न मिळाल्याने कोलकाताला मोठी मजल मारता आली नाही. त्याच्यासह रॉबिन उथप्पा आणि दिनेश कार्तिक यांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली.
दीपक चहरचा भेदक मारादीपक चहर याने कोलकाता नाइट रायडर्सच्या फलंदाजीला खिंडार पाडताना त्यांचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी धाडले. त्याला क्षेत्ररक्षकांकडूनही उत्तम साथ मिळल्याने कोलकाताची वाट बिकट झाली. केवळ ४४ धावांत अर्धा संघ बाद झाल्यानंतर कोलकाताचे इतर फलंदाज दडपणाखाली आले.

टॅग्स :आयपीएल लिलाव 2019