Join us  

धोनीला विलंबाने पाठविणे चूकच होती

‘प्ले-आॅफ म्हणजे प्ले-आॅफच, समीकरणे वेगळी, दडपण वेगळे आणि साखळी फेरीतील शानदार फॉर्मला महत्त्व नसते.’ मँचेस्टरमध्ये दोन दिवस रंगलेल्या एकदिवसीय ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 5:16 AM

Open in App

‘प्ले-आॅफ म्हणजे प्ले-आॅफच, समीकरणे वेगळी, दडपण वेगळे आणि साखळी फेरीतील शानदार फॉर्मला महत्त्व नसते.’ मँचेस्टरमध्ये दोन दिवस रंगलेल्या एकदिवसीय लढतीनंतर भारतीय संघापेक्षा हे कुणाला अधिक चांगले माहीत असेल. भारतीय संघ २०१५ पासून मँचेस्टरमध्ये पराभूत झाला नव्हता, पण महत्त्वाच्या लढतीत त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. उपांत्य लढतीत मोठे दडपण असते किंबहुना एकवेळ तर ते फायनलपेक्षाही अधिक असते.

फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने वेगळा खेळ केला. भारताच्या दर्जेदार गोलंदाजी आक्रमणाने त्यांना सातत्याने दडपणाखाली ठेवले. या आक्रमणाचे नेतृत्व सर्वोत्तम मारा करणाऱ्या बुमराहने केले. न्यूझीलंडचा डाव २३९ धावांत रोखल्या गेल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनाही भारतीय फलंदाज हे लक्ष्य सहज गाठतील, असे वाटत होते. केवळ मोठ्या लढतीत धावफलकाचे दडपण, ही एकमेव बाब त्यांना दिलासा देणारी होती.

विश्वचषक स्पर्धेत सातत्याने आणि त्यापूर्वीही भारतीय चाहत्यांना सातत्याने एक भीती होती की जर आपण रोहित व कोहली यांना लवकर गमावले तर काय होईल ? विशेषता धवन दुखापतग्रस्त झाल्यानंतर. नेमके महत्त्वाच्या लढतीत तेच घडले. ३ बाद ५ अशा स्थितीतून सावरणे भारतीय संघासाठी अग्निदिव्य पार करण्यासारखे होते. नव्या चेंडूने न्यूझीलंडने भेदक मारा केला. कोहलीची विकेट म्हणजे बोल्ट व विलियम्सन यांनी चांगली योजना रचल्याचा परिपाक होता. एखाद्या वेळी तुमची शक्ती हा तुमचा कमकुवत दुवा ठरतो आणि कोहलीच्या पॅडवर चेंडू आदळला आणि रिचर्ड इलिंगवर्थचे बोट आकाशाकडे उंचावले आणि भारतीय डाव अडचणीत आला.

साखळी फेरीत चमकदार कामगिरी करणाºया भारतीय संघाने काही आश्चर्यचकित करणारे निर्णय घेतले. तीन विकेट झटपट गेल्यानंतर महेंद्रसिंग धोनीला उशिरा खेळविण्याचा निर्णय आश्चर्यचकित करणारा होता. अशा वेळी डाव सावरण्यासाठी युवा रिषभ पंतपेक्षा धोनी उपयुक्त ठरला असता.

भारतीय संघाला त्यावेळी युवा खेळाडूच्या उत्साहासोबत शांतचित्त धोनीच्या साहाय्याने डावाची बांधणी करण्याची गरज होती. त्यामुळे संघासाठी ही मोठी चूक होती. त्याचप्रमाणे मोहम्मद शमीला वगळण्याचा निर्णय समजण्यापलीकडे होता. भुवनेश्वर कुमारबाबत मला आदर आहे, पण शमीचा फॉर्म विशेषता विकेट कॉलम बघितल्यानंतर तो कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटसाठी योग्य निवड असल्याचे सिद्ध होते. भारतीय संघासाठी रवींद्र जडेजा सर्वोत्तम ठरला. (गेमप्लॅन)

-सौरव गांगुली

टॅग्स :वर्ल्ड कप 2019