आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपरकिंग्सचा ५० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने १९६ धावा फटकावल्यानंतर १९७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा डाव सुरुवातीपासूनच गडगडला. या सामन्यात अखेरच्या षटकामध्ये महेंद्रसिंग धोनीने आक्रमक फलंदाजी करत प्रेक्षकांच मनोरंजन केलं. मात्र संघ अडचणीत असताना चेन्नई सुपरकिंग्सचा आधारस्तंभ असलेला धोनी अगदी तळाला, म्हणजेच नवव्या क्रमांकावर फलंदाजीस आल्याने आता त्याच्यावर टीका होत आहे. तसेच सोशल मीडियावरून नेटिझन्स त्याला ट्रोल करत आहेत.
१९७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. तेराव्या षटकामध्ये शिवम दुबे माघारी परतला. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी फलंदाजीस येईल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र धोनीऐवजी आर. अश्विन फलंदाजीसाठी आला. तर अश्विन बाद झाल्यानंतर सोळाव्या षटकामध्ये धोनी फलंदाजीस आला. मात्र तोपर्यंत सामना चेन्नईच्या हातून निसटला होता.
धोनीने शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करताान १६ चेंडूत नाबाद ३० धावांची खेळी केली. मात्र या खेळीनंतरही चेन्नईला ५० धावांच्या फरकाने मोठा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता धोनीला सोशल मीडियावरून ट्रोल केलं जात आहे.
धोनी आज फलंदाजीसाठी नवव्या क्रमांकावर आला. त्याच्या कारकिर्दीमधील हा निचांकी क्षण आहे. आता त्याने सन्मानाने निवृत्त व्हायला हवं, असा सल्ला एका युझरने दिला आहे.
तर १९७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना चेन्नईचा संघ १०० धावांच्या आसपास संघर्ष करत होता. अशावेळी महेंद्रसिंग धोनीने नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणं, हे चेन्नईने सामना सोडून दिल्याचं लक्षण होतं. केवळ एक दोन षटकार ठोकून पीआर करण्यासाठी धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता का? असा सवालही एका युझरने विचारला आहे.
Web Title: IPL 2025, CSK Vs RCB: When the team was in trouble, he came to bat at number nine, Dhoni is being trolled even after batting.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.