दुबई: आयपीएल २०२० मध्ये (IPL 2020) आज चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) सामना सनरायझर्स हैदराबादशी (Sunrisers Hyderabad) होत आहे. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुबईत आतापर्यंत ६ आयपीएल सामने झाले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं विजय मिळवला आहे. त्यामुळे धोनीच्या संघासमोर खडतर आव्हान आहे. त्यातच संघ गुणतालिकेत तळाला असल्यानं विजय आवश्यक आहे.
हैदराबादची फलंदाजी सुरू होताच पहिल्याच षटकात चेन्नईच्या दीपक चहरनं जॉनी बेरिस्टोचा त्रिफळा उडवत शानदार सुरुवात केली. बेरिस्टोला भोपळादेखील फोडता आला नाही. बेरिस्टो बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मनिष पांडेनं डेव्हिड वॉर्नरला चांगली साथ दिली. मात्र आज संधी मिळालेल्या चेन्नईच्या शार्दुल ठाकूरनं पांडेला २९ धावांवर बाद करत हैदराबादला दुसरा धक्का दिला.
अकरावं षटक चेन्नईसाठी महत्त्वाचं ठरलं. पियूष चावलानं टाकलेल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नर झेलबाद झाला. याच षटकाच्या पुढच्या आणि शेवटच्या चेंडूवर केन विल्यमसन धावबाद झाला. प्रियम गर्गच्या चुकीमुळे विल्यमसनला अवघ्या ९ धावा काढून माघारी परतावं लागलं. यानंतर विल्यमसन काहीसा संतापलेला दिसला.
विल्यमसन बाद झाल्यावर प्रियम काहीसा दबावाखाली होता. चार महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यानं बरीचशी जबाबदारी गर्गवर होती. गर्गनं दबाव झुगारून फटकेबाजी करत अभिषेक शर्मासोबत ७७ धावांची भागिदारी रचली. गर्गनं २६ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं नाबाद ५१ धावांची खेळी केली. गर्गच्या फलंदाजीमुळे हैदराबादला १६४ धावांपर्यंत मजल मारता आली.
गर्गच्या शानदार फलंदाजीचं माजी क्रिकेटपटू
विरेंद्र सेहवागनं तोंडभरून कौतुक केलं. 'चेन्नईला बागबानसारखी फिलिंग येत असेल. १९ वर्षांखालील फलंदाज त्यांच्या सिनियर खेळाडूंसमोर फटकेबाजी करत आहेत. प्रियम गर्गकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ही स्पर्धा तरुण खेळाडूंसाठी अतिशय जबरदस्त ठरतेय,' अशा शब्दांत सेहवागनं गर्गच्या फलंदाजीचं कौतुक केलं.