दुबई: आयपीएल २०२० मध्ये (IPL 2020) चेन्नई सुपर किंग्सला सलग तिसरा पराभव पत्करावा लागला आहे. सनरायझर्स हैदराबादनं चेन्नईवर ७ धावांनी विजय मिळवला आहे. प्रियम गर्गची शानदार अर्धशतक खेळी आणि गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे हैदराबादनं चेन्नईवर मात केली. या विजयामुळे हैदराबादचा संघ आता गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. तर सलग तिसऱ्या पराभवामुळे चेन्नई गुणतालिकेत तळाला आहे.
हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या गोलंदाजीपासून चांगली सुरुवात केली. सलामीवीर जॉन बॅरिएस्टोला दीपक चहरनं शून्यावर माघारी धाडलं. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडेनं ४६ धावांची भागिदारी रचली. मात्र पांडेला २९ धावांवर शार्दुल ठाकूरनं बाद केलं. यानंतर ११ व्या षटकात वॉर्नर आणि केन विल्यमसन लागोपाठच्या चेंडूंवर माघारी परतले. त्यामुळे हैदराबादच्या अडचणी वाढल्या.
यानंतर युवा प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मानं पाचव्या विकेटसाठी ७७ धावांची भागिदारी रचली. गर्गनं २६ चेंडूंत ५१ धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये ६ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याला शर्मानं २४ चेंडूंत ३१ धावा काढून चांगली साथ दिली. सॅम करनचा अपवाद सोडल्यास चेन्नईच्या सगळ्याच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. दीपक चहारनं २ फलंदाजांना बाद केलं. तर शार्दुल ठाकूर आणि पियूष चावलानं प्रत्येकी एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला.
हैदराबादनं २० षटकांत ५ बाद १६४ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. शेन वॉटसन, अंबाती रायडू, केदार जाधवला दुहेरी धावसंख्यादेखील गाठता आली नाही. तर सलामीवीर फॅफ ड्युप्लीसीस २२ धावा काढून माघारी परतला. त्यामुळे चेन्नईचा संघ ४ बाद ४२ असा अडचणीत सापडला.
कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि रविंद्र जाडेजानं पाचव्या विकेटसाठी ७२ धावांची भागिदारी रचत संघाच्या आशा पल्लवित केल्या. मात्र एका बाजूला आवश्यक धावगती वाढत होती. त्यामुळे मोठे फटके मारणं गरजेचं आहे. जाडेजानं ३५ चेंडूंत ५० धावांची खेळी साकारली. मात्र फटकेबाजी करताना तो बाद झाला. धोनीनं मोठे फटके मारण्यास सुरुवात केली तेव्हा उशिरा झाला होता. धोनी ३६ चेंडूंत ४७ धावा काढून नाबाद राहिला. चेन्नईला २० षटकांत ५ बाद १५७ धावाच करता आल्या.