Join us  

IPL 2018 : यंदाच्या सत्रात पाच दिग्गज फेल, अपेक्षित कामगिरी करण्यात ठरले अपयशी

आयपीएल सुरू होऊन तीन आठवडे झाले असून ही स्पर्धा आता मुख्य प्रवाहात आली आहे. सर्वच संघांचे प्रत्येकी ७ सामने खेळून झालेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ टॉपवर आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 12:53 AM

Open in App

सचिन कोरडे  पणजी : आयपीएल सुरू होऊन तीन आठवडे झाले असून ही स्पर्धा आता मुख्य प्रवाहात आली आहे. सर्वच संघांचे प्रत्येकी ७ सामने खेळून झालेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ टॉपवर आहेत. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स मात्र तळात पोहोचले. आता सर्व संघ पुढील सामन्यांसाठी रणनीती आखतील. त्यांचा संतुलित संघावर भर असेल. त्यामुळे संघाची निराशा करणाऱ्या खेळाडूंना ‘प्लेर्इंग इलेव्हन’मधून डच्चू मिळेल. काहींना मिळालासुद्धा. त्यात रवींद्र जडेजा, जयदेव उनाडकट, अरॉन फिंच, किएरॉन पोलार्ड आणि गौतम गंभीर यांचा समावेश आहे. या सर्वांनी मोठी निराशा केली आहे. या स्टार खेळाडूंच्या कामगिरीवर एक नजर...रवींद्र जडेजा : या सत्रात चेन्नई सुपर किंग्जने तीन खेळाडूंना कायम ठेवले होते त्यापैकी एक रवींद्र जडेजाचा समावेश आहे. जडेजा सहा सामने खेळला मात्र तो अपयशी ठरला. अष्टपैलू जडेजा फलंदाजी आणि गोलंदाजीतही काही करामत करू शकला नाही. त्याने ७ सामन्यांत १५.६७च्या सरासरीने ४७ धावा तर गोलंदाजीत केवळ एक बळी घेतला आहे. चेन्नई संघ मध्यल्या फळीत कमकुवत वाटत आहे. त्यामुळे जडेजाच्या जागी दिल्लीच्या धु्रव शौर्य याला संधी मिळण्याची शक्यता आहे.गौतम गंभीर : ७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गौतमने दिल्ली संघात पुनरागमन केले. कोलकाताकडून खेळताना त्याने २ वेळा संघाला चषक मिळवून दिला. दिल्लीकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याला दिल्लीचा ताफा मिळाला. मात्र, कर्णधार आणि फलंदाज म्हणूनही तो अपयशी ठरला. सलग पाच पराभवांनंतर गंभीरने नेतृत्व सोडले. त्याने ६ सामन्यांत ८५ धावा केल्या. पंजाबविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावून त्याने चांगली सुरुवात केली होती. त्यानंतरच्या सर्व सामन्यांत त्याने निराशा केली. त्यामुळे गौतम पहिल्यांदाच बेंचवर बसलेला दिसतोय.जयदेव उनाडकट : यंदाच्या सत्रातील महागड्या भारतीय खेळाडूंपैकी एक असलेल्या उनाडकटला राजस्थानने ११.५ कोटी रुपयांत खरेदी केले. गेल्या सत्रात उनाडकट हा सर्वाधिक बळी घेणाºयांच्या यादीत दुसरा होता. त्यामुळे राजस्थानने त्याच्यावर विश्वास दाखविला. मात्र, उनाडकटने यंदा निराशा केली. त्याने ७ सामन्यांत केवळ ४ बळी घेतले. विशेष म्हणजे तो आपला ४ षटकांचा कोटासुद्धा पूर्ण करू शकलेला नाही. त्यामुळे राजस्थान संघ त्याला पर्याय शोधेल.अ‍ॅरोन फिंच : आॅस्ट्रेलियाचा हा पॉवर हिटर फलंदाज यंदा विशेष कामगिरी करू शकला नाही. पंजाबने त्याला ६.२ कोटींना विकत घेतले तेव्हा त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, ५ सामन्यांत फिंचने केवळ २४ धावाच केल्या आहेत. त्यामुळे फिंच बेंचवर बसला आहे. त्याच्या तुलनेत डेविड मिलरने मात्र चांगली फलंदाजी केली.किएरॉन पोलार्ड : मुंबई इडियन्सचे एक भले मोठे शस्त्र म्हणून पोलार्डकडे पाहिले जाते. २०१०पासून तो संघासोबत आहे. २०१३, २०१५ आणि २०१७चे विजेतेपद मिळवून देण्यात पोलार्डचा मोठा वाटा राहिला आहे. एक उत्तम अष्टपैलू म्हणून त्याचे नाव घेतले जाते. मात्र, यंदाच्या सत्रात पोलार्ड अपयशी ठरला. त्याने यंदा एकही चेंडू फेकला नाही. यावरून तो फलंदाज म्हणून संघात होता, हे दिसून येते. परंतु, ६ सामन्यांत त्याने केवळ ६३ धावाच केल्या आहेत. त्यासुद्धा १५.७५च्या सरासरीने. २८, ०, ५, २१, ९ अशी त्याची धावसंख्या आहे. सलामीला चेन्नईविरुद्ध त्याला फलंदाजी मिळाली नाही. त्यामुळेच तो बाहेर बसला तर आश्चर्य नाही.

टॅग्स :आयपीएल 2018