कराची : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयवर नुकसानभरपाईचा दावा टाकल्याने उभय देशातील क्रिकेटसंबंध खराब होतील, अशी भीती आयसीसीचे माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी व्यक्त केली.
द्विपक्षीय क्रिकेट मालिका कराराचे उल्लंघन केल्यावरून पीसीबीने बीसीसीआयवर सात कोटी डॉलरच्या नुकसानभरपाईचा दावा दाखल केला. यावर ‘याचे दूरगामी परिणाम होण्याची भीती’ मनी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘आयसीसीत दावा दाखल करण्याआधी पीसीबीने बीसीसीआय सोबत चर्चा करायला हवी होती. चर्चा आणि पडद्यामागील कूटनीतीच्या जोरावर हा प्रश्न सुटू शकला असता. मी पीसीबीत असतो तर थोडी प्रतीक्षा केली असती. नुकसानभरपाईचे सर्वच मार्ग चोखाळून पाहिले असते.’ मनी हे २००३ ते २००६ या कालावधीत आयसीसी अध्यक्ष होते. पाकिस्तानने नुकसानभरपाईचा दावा जिंकला, तरी भारत ही रक्कम देईलच, याची शाश्वती नसल्याची भीती मनी त्यांनी व्यक्त केली. पाकने नुकसानभरपाईचा दावा जिंकला आणि भारताने रक्कम देण्यास नकार दिला, तरीही पाकला आयसीसीकडे पुन्हा धाव घ्यावी लागेल.