Join us  

भारतीय संघ मजबूत स्थितीत

मंगळवारी भारत-इंग्लंडदरम्यान पहिला टी२० सामना खेळविण्यात येईल. तीन टी२० सामन्यांच्या मालिकेनंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होईल आणि त्यानंतर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळविण्यात येईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 2:42 AM

Open in App

-अयाझ मेमन(संपादकीय सल्लागार)

मंगळवारी भारत-इंग्लंडदरम्यान पहिला टी२० सामना खेळविण्यात येईल. तीन टी२० सामन्यांच्या मालिकेनंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होईल आणि त्यानंतर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळविण्यात येईल. पण त्याआधी हा पहिला सामना खूप महत्त्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. शिवाय भारताला सुरुवातीलाच काही झटके लागले आहेत. जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर दोघेही दुखापतग्रस्त झाल्याने ते हा सामना खेळणार नाहीत. माझ्या मते बुमराहच्या दुखापतग्रस्त होण्याने भारताला मोठा झटका लागला आहे. त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झाले आहे. गेल्या दीड वर्षापासून बुमराह भारताचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हुकमी गोलंदाज ठरला आहे. तो एक डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट आहे.दुसरीकडे सुंदर दुखापतग्रस्त झाला, तो फुटबॉल खेळताना. त्यामुळे एक नवा वाद निर्माण झाला आहे की, क्रिकेटपटूंनी सरावादरम्यान फुटबॉल खेळले पाहिजे का? या विषयावर दोन मुद्दे आहेत. माझ्या मते गेल्या ५-६ वर्षांपासून आपण पाहतो की सरावादरम्यान टीम इंडिया नेहमी फुटबॉल खेळण्यावर भर देते. का? तर फुटबॉलमधून आवश्यक तो सर्व सराव मिळतो, शरीराची योग्य हालचाल होते. त्याचबरोबर एक सांघिक भावना निर्माण होते. त्यामुळे फुटबॉल खेळले जाते. आता याचे दुष्परिणाम काय हे बघायचे झाल्यास, सुंदरसारखा अष्टपैलू खेळाडू दुखापतग्रस्त होत असेल, तर हा धोका पत्करण्यासारखा आहे का हे पाहावे लागेल. माझ्या मते रोहित शर्माही अशाच प्रकारे दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे माझ्या मते फुटबॉल पूर्णपणे खेळू नये असे नाही, पण त्यात काही सुधारणा करावयाची आवश्यकता आहे.आता हे दोन खेळाडू खेळणार नसल्याने संधी मिळाली ती कृणाल पांड्या आणि दीपक चहर यांना. माझ्या मते कृणालसाठी ही संधी एक पारितोषिक आहे. त्याने सातत्याने देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. आता भारताची गोलंदाजी उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या यांच्यावर अवलंबून असेल. फलंदाजीमध्ये रोहित शर्मा - शिखर धवन सलामी जोडी म्हणून निश्चित असेल. कोहली व धोनीचे स्थान नक्की असणार. तरी लोकेश राहुल, सुरेश रैना, मनिष पांडे आणि दिनेश कार्तिक यांच्यातून दोघांची अंतिम संघात निवड होईल. माझ्या मते राहुल जवळपास निश्चित असेल. चांगल्या फॉर्ममध्ये असून तो कोणत्याही स्थानी खेळू शकतो. मनिष पांडे सध्या झगडत आहे, तर रैना मागच्या सामन्यात चांगला खेळला होता. शिवाय तो गोलंदाजीतही पर्याय ठरेल. तरी कार्तिकसोबत त्याची मोठी स्पर्धा असेल. त्यामुळे भारतीय संघ जबरदस्त मजबूत असून त्यांच्यापुढे फॉर्ममध्ये असलेल्या इंग्लंडचे तगडे आव्हान आहे.

व्हिडीओसाठी पाहा ... https://www.facebook.com/lokmat/videos

टॅग्स :क्रिकेट