Join us  

कसोटी विजयाचे शतक गाठण्याची भारताला संधी

श्रीलंकेविरुद्ध १६ नोव्हेंबरपासून कोलकाता येथे सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने ‘क्लीन स्वीप’ केल्यास मायदेशात कसोटी विजयाचे शतक साजरे होणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 4:03 AM

Open in App

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्ध १६ नोव्हेंबरपासून कोलकाता येथे सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने ‘क्लीन स्वीप’ केल्यास मायदेशात कसोटी विजयाचे शतक साजरे होणार आहे. ही कामगिरी करणारा भारत तिसरा देश ठरेल. इतकेच नव्हेतर विराट कोहली देखील सर्वांत यशस्वी कर्णधारांच्या यादीत दुस-या स्थानावर विराजमान होईल.भारताचा भारतात लंकेकडून आतापर्यंत कसोटीत पराभव झालेला नाही. याआधी १९९३-९४ मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध क्लीन स्वीप केले आहे. यंदा तिन्ही सामने भारताने जिंकल्यास विजयाचे शतक साजरे होईल. आॅस्ट्रेलियाने मायदेशात २३४ आणि इंग्लंडने २१२ सामने जिंकले आहेत.भारताने मायदेशात एकूण २६१ कसोटी सामने खेळले. त्यातील ९७ जिंकले. ५२ सामन्यात पराभव झाला. १११ सामने अनिर्णीत राहीले. एक सामना ड्रॉ तर एक टाय झाला. मायदेशात विजय मिळविणा-या देशांमध्ये भारत सध्या चौथ्या स्थानावर आहे. द. आफ्रिकेने ९८ विजय नोंदविले आहेत. त्यांना विजयाचे शतक गाठण्यासाठी पुढच्या वर्षापर्यत प्रतीक्षा करावी लागेल.लंकेने भारतात १७ कसोटी सामने खेळले.त्यातील दहा सामने भारताने जिंकले तर सात अनिर्णीत राहीले. उभय संघांत अखेरचा सामना २००९ मध्ये झाला होता. भारताने जे ९७ सामने जिंकले त्यातील ४८ विजय हे एक जानेवारी २००१ नंतरचे आहेत. लंकेने या दौ-यात एक कसोटी गमविली तरी त्यांच्या नावे कसोटी पराभवाच्या शतकाची नोंद होणार आहे.

कोहलीच्या नेतृत्वात भारताने क्लीन स्वीप केल्यास महेंद्रसिंग धोनीनंतर तो देशाचा सर्वांत यशस्वी कर्णधार बनेल. कोहलीच्या नेतृत्वात २९ कसोटी पैकी १९ सामने भारताने जिंकले. धोनीने ६० पैकी २७ तसेच गांगुलीने ४७ पैकी २१ कसोटी विजय मिळवून दिले आहेत. भारतात विराटच्या नेतृत्वात संघाला १६ पैकी १२ सामन्यात विजय मिळाले आहेत. 

टॅग्स :क्रीडाक्रिकेटविराट कोहलीएम. एस. धोनी