Join us  

India Vs England Test : ' या ' गोष्टी करू शकतात विराट सेनेचा ' गेम '

कसोटी मालिका सुरु व्हायला आता काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे इंग्लंड संघाच्या खेळाडूंच्या अभ्यासाबरोबर या काही गोष्टींवर भारतीय संघाने विचार करायला हवा.

By प्रसाद लाड | Published: July 25, 2018 3:05 PM

Open in App
ठळक मुद्देजर भारतीय संघ या गोष्टींचा विचार करत नसेल तर त्यांची ही मोठी चूक ठरेल.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारतीय संघ इंग्लंडच्या खेळाडूंच्या खेळाचा अभ्यास करण्यात गर्क असेल. पण या दौऱ्यात अशा काही गोष्टी आहे, ज्या भारतीय संघाचा ' गेम ' करू शकतात.

कालची गोष्ट. भारतीय संघ सरावाला उतरला होता. इसेक्सविरुद्ध त्यांचा चार दिवसाचा सराव सामना होता. पण संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या सामन्यापूर्वी खेळपट्टी पाहिली. खेळपट्टीवर गवत होते. गवत पाहून त्यांचा पारा चढला आणि आम्ही या खेळपट्टीवर खेळू शकत नाही, असे फर्मान काढले. असंच एकदा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीही नागपूरच्या कसोटीपूर्वी खेळपट्टीवर गवत पाहून पळाला होता. पण इंग्लंडमध्ये गेल्यावर तुम्हाला खेळपट्टीवर गवत मिळणार नाही तर काय भारतासारखी आखाडा खेळपट्टी मिळणार का, याचा विचार करायला हवा. कसोटी सामन्यात जर खेळपट्टीवर गवत असेल तेव्हादेखील शास्त्री हीच भूमिका घेणार का, हा मोठा प्रश्न आहे. इंग्लंडमध्ये गेल्यावर पहिली गोष्ट जी भारतीय संघासाठी घातक ठरू शकते ती म्हणजे खेळपट्टी. भारतात तुम्ही फिरकीला पोषक खेळपट्टी बनवता, मग इंग्लंडमध्ये स्विगं आणि वेगवान गोलंदाजीला पोषक खेळपट्टी बनवली तर त्यांचे काहीच चुकत नसावे.

भारतापुढे सर्वात मोठे दुसरे आव्हान असेल ते वातावरणाचे. कारण भारतीय संघ अजूनही या वातावरणाशी समरस झालेला दिसत नाही. इंग्लंडमध्ये एकाच दिवसात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तिन्ही ऋतू पाहायला मिळू शकतात. या वातावरणानुसार खेळपट्टी बदलते आणि त्यानुसार खेळही बदलायला लागतो. ट्वेन्टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये या गोष्टीचा जास्त प्रभाव दिसत नाही, पण कसोटी क्रिकेटमध्ये मात्र या वातावरणामुळे बराच फरक पडू शकतो.

भारतीय संघाला सध्याच्या घडीला चिंता सतावते आहे ती दुखापतींची. कारण पाठिच्या दुखण्यामुळे भुवनेश्वर कुमार संघाबाहेर आहे. यष्टीरक्षक वृद्धिमान साहा तर दुखापतीमुएळ वर्षभर खेळू शकणार नाही. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या अंगठ्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. पण ही शस्त्रक्रीया अपेक्षेनुसार यशस्वी ठरलेली नाही. त्यामुळे बुमराला 4-5 आठवडे विश्रांती करावी लागणार आहे. कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच भारताने आपले तीन खंदे खेळाडू गमावले आहेत. हा दुखापतींचा ससेमिरा असाच राहिला तर भारतीय संघावर मोठी आपत्ती येऊ शकते.

कसोटी मालिका सुरु व्हायला आता काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे इंग्लंड संघाच्या खेळाडूंच्या अभ्यासाबरोबर या काही गोष्टींवर भारतीय संघाने विचार करायला हवा. जर भारतीय संघ या गोष्टींचा विचार करत नसेल तर त्यांची ही मोठी चूक ठरेल.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरवी शास्त्री