विजयवाडा : महाराष्ट्राचा शैलीदार फलंदाज अंकित बावणे याने प्रथमश्रेणी क्रिकेटमधील झळकावलेल्या नाबाद तडाखेबंद १६ व्या शतकी खेळीच्या बळावर भारत अ संघाने न्यूझीलंड अ संघावर वर्चस्व ठेवताना पहिल्या डावात आघाडी घेतली. श्रेयस अय्यरने ७९ चेंडूंत ८२ धावा फटकावत मजबूत पाया रचल्यानंतर अंकित बावणे याने भारतीय संघाची स्थिती आणखी मजबूत केली. त्यामुळे दिवसअखेर भारत अ संघाने ४ बाद ३६0 धावा केल्या. अंधुक प्रकाशामुळे आज लवकर खेळ थांबला. तेव्हा भारत अ संघाने एकूण १४९ धावांची आघाडी घेतली आहे.
हनुमा विहारी याच्या स्थानावर अंतिम संघात स्थान मिळणाºया अंकित बावणे याने मिळालेल्या संधीचे सोने केले. त्याने आजारी असलेल्या ऋषभ पंतमुळे संघात स्थान मिळालेल्या पार्थिव पटेल याच्या साथीने पाचव्या गड्यासाठी नाबाद १५४ धावांची भागीदारी केली. तब्बल ९ वर्षांनंतर भारत अ संघाकडून खेळणारा पार्थिव पटेल ५६ धावांवर खेळत आहे. तुलनेत आजचा दिवस गाजवणाºया अंकित बावणे याने स्फोटक फलंदाजी केली. ७२ प्रथमश्रेणी सामन्यात ५१.१७ अशी जबरदस्त सरासरी राखणाºया अंकितने आज १३ सणसणीत चौकार आणि ५ टोलेजंग षटकारासह १६६ चेंडूंत नाबाद ११६ धावा केल्या.
प्रियांक पांचाळ आणि कर्णधार करुण नायर हे चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करूशकले नाहीत. त्यांनी अनुक्रमे ४६ आणि ४३ धावा केल्या. तत्पूर्वी, गेल्या आठवड्यात शतक ठोकणाºया श्रेयस अय्यरने आक्रमक फलंदाजी पांचाळसोबत दुसºया गड्यासाठी १३३ धावांची भागीदारी केली. तथापि, न्यूझीलंडने ९ धावांच्या अंतरात श्रेयस अय्यर आणि पांचाळ यांना तंबूत धाडत भारत अ संघाची स्थिती ३ बाद १४२ अशी केली. इश सोधीने कर्णधार करुण नायरला स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद करीत भारताला चौथा धक्का दिला; परंतु त्यानंतर चौफेर टोलेबाजी करणाºया अंकित बावणे आणि पार्थिव पटेल यांनी पुढील २८ षटकांत न्यूझीलंडला यशापासून वंचित ठेवले.
संक्षिप्त धावफलक :
न्यूझीलंड अ संघ :
पहिला डाव २११.
भारत अ : ८२ षटकांत ४ बाद ३६0. अंकित बावणे खेळत आहे ११६, श्रेयस अय्यर ८२, पार्थिव पटेल खेळत आहे ५६, प्रियांक पांचाळ ४६, करुण नायर ४३. इश सोधी २/१0७).