दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) श्रीलंकेच्या भ्रष्टाचार विरोधी चौकशीस प्रारंभ केला
आहे, पण या देशासोबत जुळलेली कुठली विशिष्ट मालिका चौकशीच्या फे-यात आहे किंवा नाही, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
आयसीसीने स्पष्ट केले की,‘आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी समितीने अलीकडेच चौकशीसाठी श्रीलंकेचा दौरा केला होता.’ आयसीसीचे एसीयू महाव्यवस्थापक अॅलेक्स मार्शल यांनी सांगितले की, ‘आयसीसी भ्रष्टाचार विरोधी समिती क्रिकेटमध्ये प्रामाणिकपणा कायम ठेवण्यासाठी कार्य करते. त्यात तर्कसंगत आधार असलेल्या स्थळावर चौकशी करण्याचाही समावेश आहे.’
श्रीलंकेने झिम्बाब्वेविरुद्ध मायदेशात खेळल्या गेलेली मालिका २-३ ने गमावली होती तर भारताविरुद्ध तीन कसोटी, पाच वन-डे व एक टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांना क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले.
१९९६च्या विश्वचषक विजेत्या श्रीलंका संघातील सदस्य प्रमोद्य विक्रमसिंघे यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ४० करारबद्ध खेळाडूंची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर एक दिवसाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने स्पष्टीकरण दिले आहे.
आयसीसीने स्पष्ट केले,‘सध्या श्रीलंकेत आयसीसीची (एसीयू) चौकशी सुरू आहे. त्यासाठी अनेकांसोबत बातचित सुरू आहे. सध्याच चौकशीबाबत आम्ही कुठलेही वक्तव्य करणार नाही. जर कुणाकडे एसीयूच्या चौकशीला मदत मिळेल अशी माहिती असेल तर त्यांनी चौकशीसाठी मदत करावी, असे आम्ही आवाहन करतो.’
श्रीलंका क्रिकेटच्या सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार आयसीसी भ्रष्टाचार विरोधी समितीच्या किमान तीन सदस्यांनी श्रीलंकेत क्रिकेट अधिकाºयांची भेट घेतली. श्रीलंका संघ या आठवड्यात यूएईला जाणार आहे. तेथे पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी, पाच वन-डे आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. (वृत्तसंस्था)
विक्रमसिंघेने स्पष्ट केले की,‘मी कधीच खेळाडूविरुद्ध आरोप केलेले नाही. मी केवळ चौकशी करण्याची सूचना केली.’ श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी) स्पष्ट केले की, खेळाडूंनी विक्रमसिंघे यांच्या आरोपांवर नाराजी व्यक्त केली आहे. विक्रमसिंघे यांचे आरोप आधारहीन, अपमानजनक आणि वेदनादायी असल्याचे सांगताना खेळाडूंनी हे आरोप फेटाळले आहेत. कर्णधार दिनेश चांदीमल व उपुल थरंगासह खेळाडूंनी एसएलसीला आवाहन केले की, विक्रमसिंघे यांना पाचारण करीत लगेच चौकशी सुरू करण्यात यावी. कारण या आरोपांमुळे सर्वांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. एसएलसीने मात्र विक्रमसिंघेविरुद्ध चौकशी सुरू केली किंवा नाही, हे स्पष्ट केलेले नाही