Join us  

चेन्नईला हरवायचे कसे? राजस्थानपुढे डोकेदुखी

घरच्या मैदानावर रॉयल्सपुढे सुपरकिंग्सचे तगडे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 7:13 AM

Open in App

जयपूर : अडचणीत वाढ झालेल्या राजस्थान रॉयल्सची गाठ गुरुवारी फॉर्ममध्ये असलेल्या बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध असेल. विजय मिळवून चमत्कार घडवायचा कसा, याचे डावपेच आखण्यात यजमान संघ व्यस्त आहे.

आरसीबीवर विजय मिळविल्यानंतर राजस्थान संघात आत्मविश्वास संचारला. हा संघ आठ सामन्यांच्या गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. चेन्नईवर आश्चर्यकारक विजय मिळविण्याच्या इराद्याने राजस्थानचे खेळाडू उतरणार आहेत. दुसरीकडे चेन्नईने मंगळवारी केकेआरचा सात गड्यांनी पराभव केला. सहा विजयासह संघाने गुणतालिकेतही अव्वल स्थान कायम राखले. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात या संघात कुठल्याही मैदानावर कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूंचा भरणा आहे.

राजस्थान मात्र संघर्ष करीत असून, स्पर्धेत कायम राहण्यासाठी संघाला उर्वरित सर्वच सामने जिंकावे लागणार आहेत. यंदा पहिले शतक झळकविणारा संजू सॅमसन जखमांनी त्रस्त असून, शानदार सुरुवात करणारा जोस बटलर मागच्या दोन सामन्यात अपयशी ठरला होता. या संघाच्या जमेची बाजू मात्र अशी की स्टीव्ह स्मिथ याला सूर गवसला आहे. त्याने आरबीसीविरुद्ध ३८ व केकेआरविरुद्ध नाबाद ७३ धावा ठोकल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे, राहुल त्रिपाठी व बेन स्टोक्स हे अपयश्ी ठरले असले तरी, त्यांची उणीव भरून काढणारी राखीव फळीही संघाकडे नाही. संघाच्या गोलंदाजीतही भेदकता दिसत नाही. स्टोक्स, उनाडकट, धवल कुलकर्णी यांच्यापुढे चेन्नईच्या फलंदाजांवर आवर घालण्याचे आव्हान असेल. रहाणे याने मात्र चिंता करण्याचे कारण नाही, असे स्पष्ट केले.

याउलट चेन्नई अधिक बलाढ्य वाटतो. धोनीसह शेन वाटसन व फाफ डुप्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायुडू व केदार जाधव हेही धावा काढण्यात योगदान देत आहेत. वेगवान व फिरकी माऱ्याच्या बळावर प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्यात गोलंदाज मोलाची कामगिरी बजावतात. सवाई मानसिंग स्टेडियमच्या संथ खेळपट्टीवर सुपरकिंग्सचे गोलंदाज पुन्हा एकदा वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करतील.

टॅग्स :आयपीएल 2019चेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर