सिडनी : चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणानंतर अस्वस्थ झालेल्या डेव्हिड वॉर्नरने शनिवारी पत्रकार परिषदेत आॅस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळण्याची उरलीसुरली आशा मावळल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली तेव्हा अश्रूंना बांध फुटला होता.
रडत रडत तो म्हणाला,‘उपकर्णधारपदाचा राजीनामा दिला, पण पुन्हा देशासाठी खेळण्याची शक्यता आता क्षीण झाली आहे,’अत्यंत भावनिक झालेल्या वॉनरने आॅस्ट्रेलियाकडून पुन्हा क्रिकेट खेळायला मिळेल, अशी आशाही वाटत नसल्याचे सांगितले.
चेंडू कुरतडल्याप्रकरणी स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर वर्षभराची बंदी घालण्यात आली आहे. पण आज डेव्हिड वॉर्नरने स्वत:ची हताश प्रतिक्रिया व्यक्त करीत आॅस्ट्रेलियन क्रिकेटमधील कारकीर्द संपल्यात जमा असल्याची भावना व्यक्त केली.
‘चेंडू कुरतडल्याच्या प्रकरामुळे आॅस्ट्रेलियन क्रिकेट संघाची चांगलीच बदनामी झाली. पण आमचा आॅस्ट्रेलिया संघ पुन्हा एकदा नव्या जोशात आणि नव्या उत्साहात मैदानावर परत येईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. मी त्या संघाचा भाग आता नसेन, असेच मला वाटते आहे; कारण एवढे सगळे प्रकरण झाल्यावर मला वाटत होते की, कदाचित मला मी जी चूक केली आहे त्यासाठी मला माफ केले जाईल. मात्र आता माफी मिळण्याची उरलीसुरली आशाही मावळली आहे. आॅस्ट्रेलिया संघाचा पुढे मी भाग असेन, असे मला मुळीच वाटत नाही. झाल्या प्रकाराबद्दल मी देशाची माफी मागतो.’
यादरम्यान पत्रकारांपुढे वॉर्नरने वारंवार खेद व्यक्त केला. सर्व प्रकरण घडल्यांनतर वॉर्नरची ही पहिलीच पत्रकार परिषद होती. तो म्हणाला, ‘आॅस्ट्रेलियाच्या प्रत्येक नागरिकाची मी माफी मागतो. तुम्ही क्रिकेटप्रेमी नसलात तरीही तुमची माफी मागतो. माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे देशाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली. त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची कितीही वेळा माफी मागायला तयार आहे. मी टीम आॅस्ट्रेलियाचा उपकर्णधार म्हणून मुळीच चांगली कामगिरी करू शकलो नाही, अशीही खंत त्याने व्यक्त केली.(वृत्तसंस्था)
शिक्षेविरुद्ध अपिलावर मौन...
क्रिकेट आॅस्ट्रेलियाच्या शिक्षेविरुद्ध अपील करणार का, असा वारंवार प्रश्न केल्यावर वॉर्नरने मौन पाळले. याआधीही असा प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता का, या प्रश्नाच्या उत्तरात त्याने बोलणे टाळले. संभाव्य अपीलबाबत तो इतकेच म्हणाला,‘कुटुुंबीयांसोबत चर्चा झाल्यानंतरच पुढील दिशा निश्चित करणार आहे.’