Join us  

विदेशातील भारताच्या पहिल्या कसोटी विजयाचे ‘अर्धशतक’, १९६८ साली जिंकला होता ऐतिहासिक सामना

१९३२मध्ये जागतिक क्रिकेटमध्ये पदार्पण करणाºया भारतीय संघाला विदेश दौºयावर आपला पहिला विजय नोंदविण्यासाठी ३६ वर्षे वाट पाहावी लागली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 2:18 AM

Open in App

पुणे : १९३२मध्ये जागतिक क्रिकेटमध्ये पदार्पण करणा-या भारतीय संघाला विदेश दौºयावर आपला पहिला विजय नोंदविण्यासाठी ३६ वर्षे वाट पाहावी लागली. १९६७-६८मध्ये आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या दौºयावर गेलेल्या मन्सूर अली खान पतौडीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने १५ ते २० फेब्रुवारी १९६८ दरम्यान न्यूझीलंडमधील डब्लिन येथे झालेल्या पहिल्याच कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा ५ गडी राखून पराभव केला होता. कसोटी पदार्पणानंतर सुमारे ३६ वर्षांनी भारताने विदेशातील पहिला कसोटी विजय नोंदविला. इतकेच नाही, तर १५ फेब्रुवारी ते १८ मार्च १९६८ दरम्यान झालेली ही चार कसोटी सामन्यांची मालिका भारताने ३-१ अशी जिंकून भारताने पहिला कसोटी मालिका विजयसुद्धा नोंदवला.क्रिकेटविश्वात सध्या भारतीय क्रिकेटचा दबदबा असला तरी त्यांना कसोटी क्रिकेटमध्ये परदेशातआपला पहिला विजय नोंदविण्यासाठी तब्बल३६ वर्षे वाट पाहावी लागली होती. मन्सूर अली खान पतौडीच्या नेतृत्वाखाली१५ ते २० फेब्रुवारी1968दरम्यान डब्लिन (न्यूझीलंड) येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारताने न्यूझीलंडला ५ विकेटने पराभूत केले होते. चार सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली होती. त्या विजयाला ५० वर्षे पूर्णझाली आहेत. त्यानिमित्ताने...डब्लिन येथील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार ग्रॅहम डाउलिंग याच्या शतकी खेळीच्या (१४३) जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात ३५९ धावा केल्या होत्या. त्यानंतर अजित वाडेकर (८०) आणि यष्टिरक्षक फारुख इंजिनीअर (६३), चंदू बोर्डे (२१), पतौडी (२४), रुसी सुर्ती (२८) यांनी भारताच्या पहिल्या डावाला आकार देऊन तीनशेचा पल्ला गाठला. तर गोलंदाज रमाकांत देसाई (३२) व बिशनसिंग बेदी (२२) यांनी ५७ धावांची चिवट भागीदारी करून भारताला ३६८ची मजल गाठून दिली व त्यामुळे पहिल्या डावात भारताला ९ धावांची आघाडी मिळाली.न्यूझीलंडच्या दुसºया डावात बु्रस भरे (५४) व एम. जी. बर्जेस (३९) सोडून इतर कुणाचाही भारतीय फिरकीपुढे निभाव लागू शकला नाही आणि न्यूझीलंडचा डाव अवघ्या २०८ धावांत गुंडाळला गेला. इरापल्ली प्रसन्नाने ४० षटकांत केवळ ९४ धावा देऊन ६ बळी घेत न्यूझीलंडची वाताहत केली. तर बिशनसिंग बेदी (२२-११-४४-१) आणि बापू नाडकर्णी (१२-७-१३-१) यांनी आपल्या डावखुºया अचूक गोलंदाजीने न्यूझीलंडच्या फलंदाजांची पुरती कोंडी केली. त्यानंतर वाडेकर (७१), रुसी सुर्ती (४४),चंदू बोर्डे (१५) यांनी संयमी फलंदाजी करून विजयासाठी आवश्यक १९९ धावांचे लक्ष्य गाठले व भारताने ५ गडी राखून या ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. यानंतर दुसरा सामना जिंकण्यात न्यूझीलंडला यश प्राप्त झाले. तरी तिसरा सामना भारताने ८ गडी राखून जिंकला आणि चौथा सामना २७२ धावांनी जिंकला व मालिकेतील आपले प्रभुत्व सिद्ध केले. या दौºयादरम्यानही रमाकांत देसाईचा अपवाद वगळता कुणी अनुभवी द्रुतगती गोलंदाज संघात नव्हता व बचावासाठी मदार पूर्णत: फिरकीवरच होती; परंतु कर्णधार पतौडीने फिरकीपटूंचा आक्रमकतेने वापर करण्याची नीती अवलंबली व ती यशस्वी ठरली. डब्लिनमधील सामना आमच्यासाठी अविस्मरणीय होता. विदेशातील तो पहिला विजय असल्यामुळे आम्ही खूप आनंदी होतो. या सामन्यात अजितने न्यूझीलंडच्या वेगवान माºयाला सडेतोड उत्तर दिले होते. दुसरीकडे प्रसन्नच्या गोलंदाजीत विविधता असल्याने त्याला सामोरे जाण्यात न्यूझीलंडला कठीण जात होते. त्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. अजित आणि माझी थोडी भागीदारीसुद्धा झाली होती. एकूणंच तो दौरा आमच्यासाठी मालिका विजयामुळे खूप महत्त्वाचा ठरला. - चंदू बोर्डेतो अप्रतिम सामना होता. त्यावेळी पावसाचे वातावरण होते. न्यूझीलंडचे डीक मॉत्झ आणि ब्रुस टेलर जबरदस्त गोलंदाज होते. त्यांच्याविरुद्ध केवळ उभे राहण्याचे मी ठरवले होते, कारण दुसºया बाजूने गडी बाद होत होते. त्यानंतर नशिबाने मी जम बसवू शकलो आणि मला चेंडू स्पष्टपणे दिसू लागला होता. मुंबई क्रिकेटच्या अनुभवाने जिद्दिने मी खेळपट्टीवर टिकून राहिलो. शिवाय प्रसन्नाची कामगिरी शानदार ठरली होती. माझ्या मते तो जगातील सर्वोत्तम आॅफ स्पिनर आहे. मी स्लीपला क्षेत्ररक्षण करायचो त्यामुळे प्रसन्नाच्या गोलंदाजीतले वैविध्य चांगल्याप्रकारे माहित होते. विशेष म्हणजे तो एकाच शैलीने मारा करत वेगामध्ये बदल करुन चेंडूला वळणही द्यायचा. - अजित वाडेकरया मालिकेत प्रसन्नाने आपल्या कौशल्यपूर्ण व धूर्त गोलंदाजीने ४ कसोटींत मिळून एकूण २४ बळी घेतले व कर्णधाराची खेळी सार्थ ठरवली, तर बिशनसिंग बेदी (१६ बळी) आणि बापू नाडकर्णी (१४ बळी) यांनी फलंदाजांवर सतत दबाव कायम ठेवून (षटकामागे सरासरी केवळ दोन धावा) डावपेच यशस्वी ठरवले. फलंदाजांमध्ये अजित वाडेकर (मालिकेत एकूण धावा ३२८), इंजिनीअर (३२१), रुसी सुर्ती (३२१), चंदू बोर्डे (२४२), पतौडी (२२१), अबिद अली (१२४) यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.

टॅग्स :क्रिकेट