विशाखापट्टणम : ‘खराब कामगिरीमुळे संघातील स्थान गमविल्याने दहा महिने मी दडपणाखाली होतो. मात्र वेस्ट इंडिजविरुद्ध साधलेली हॅट्ट्रिक ही आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली,’ असे मत ‘चायनामॅन’ गोलंदाज कुलदीप यादव याने व्यक्त केले.
२०१७ ते २०१९ या काळात भारतीय संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू असलेला कुलदीप आयपीएलमधील खराब कामगिरीमुळे त्रस्त आहे. विश्वचषकातही त्याची कामगिरी निराशादायी राहिली. तेव्हापासून चार महिने तो संघाबाहेर होता. बुधवारी आंतरराष्टÑीय क्रिकेटमध्ये दोनदा हॅट्ट्रिक घेणारा तो पहिलाच खेळाडू बनला.विजयानंतर कुलदीप म्हणाला, ‘मागील १० महिने माझ्यासाठी फारच खडतर होते. सलग चांगल्या कामगिरीनंतर ‘बॅड पॅच’ येतोच. गडी बाद करणे कठीण जात असेल तर स्वत:च्या गोलंदाजीबाबत स्वत: चिंताग्रस्त होतो. विश्वचषकान्ांतर संघाबाहेर असताना सतत गोलंदाजीवर मेहनत घेतली.’ कुलदीप पुढे म्हणाला,‘मी फार नर्व्हस होतो. बऱ्याच काळापासून आंतरराष्टÑीय क्रिकेट खेळले नव्हते. ही हॅट्ट्रिक यासाठीही सर्वोत्कृष्ट आहे, कारण माझ्यावर फार दडपण
होते.’ (वृत्तसंस्था)
हॅटट्रिक चेंडू टाकण्याधी डोक्यात काय सुरू होते, असा प्रश्न विचारल्यानंतर कुलदीप यादव म्हणाला की, ‘विद्युत प्रकाशझोतात अल्झारी जोसेफ याला कुठल्या प्रकारचा चेंडू टाकावा, याचाच विचार करत होतो. बॅड पॅचमध्येही मी चांगला मारा करीत होतो. या काळात चेंडूतील विविधतेवर बरेच काम केले. त्याचाच फायदा यावेळी झाला. मी विविधता, वेग आणि टिच्चून मारा करण्याच्या पद्धतीवर फार काम केले आहे. यामुळे गेल्या दोन एकदिवसीय सामन्यांत प्रभावी गोलंदाजी करू शकलो.’