नवी दिल्ली : कर्नाटकचा आॅफस्पिनर कृष्णप्पा गौतम याने बिनशर्त माफी मागितल्यानंतरही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याचे प्रकरण शिस्तपालन समितीकडे सोपविले आहे. गौतमने इंडिया रेड संघाकडून दुलीप ट्रॉफी स्पर्धेत पहिला सामना खेळताना ५ बळी घेतले होते. पण यानंतर तो टायफॉइड असल्याचे कारण देत बंगळुरुला रवाना झाला. तसेच, त्याने बीसीसीआयच्या परवानगीविना कर्नाटक प्रीमियर लीग स्पर्धेत एक टी-२० सामनाही खेळला. यामुळे बीसीसीआयचे महाव्यवस्थापक (खेळ विकास) रत्नाकर शेट्टी यांनी त्याला याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठविली होती.
विशेष म्हणजे, शिस्तभंगप्रकरणी गौतमला दुलीप ट्रॉफी आणि भारत ‘अ’ मालिकेत खेळण्यापासूनही रोखण्यात आले आहे. यामुळे आगामी न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध होणाºया सामन्यांसाठी भारत ‘अ’ संघातूनही त्याचे नाव वगळण्यात आले आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे बिनशर्त माफी मागताना गौतमने बेळगाव पँथर्सकडून १२ सप्टेंबरला केपीएलमध्ये खेळल्याचे विचित्र कारण दिले आहे.
गौतमने आपल्या माफीपत्रामध्ये म्हटले, ‘मला आधी वाटले, की टायफॉइड झाला आहे. परंतु हा साधारण ताप होता.’ तसेच, गौतमच्या मते ८५ मिनिटे मैदानावर राहून चार षटके गोलंदाजी करणे ठीक राहील. पण, दक्षिण आफ्रिकेत भारत ‘अ’ मालिकेमध्ये चांगले प्रदर्शन केलेले असल्याने निवडकर्त्यांची नजर आपल्यावर असल्याची कल्पना त्याला नव्हती.
त्यामुळे आता सी. के. खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीवर गौतमच्या खेळण्याबाबतचे भविष्य अवलंबून आहे. या समितीमध्ये ज्योतिरादित्य शिंदे आणि निरंजन शाह यांचाही समावेश आहे. खन्ना यांनी याप्रकरणी वृत्तसंस्थेला सांगितले, की ‘हो, मला गौतमचे माफीपत्र मिळाले आहे. माझ्या मते गौतमने दुलीप ट्रॉफीसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा अपमान करून मोठी चूक केली आहे. त्याने बिनशर्त माफी मागितली आहे.
निवड समिती खूप नाराज...
गौतम युवा खेळाडू असून आम्हाला त्याच्या कारकिर्दीकडे बघायचे आहे. त्याने याप्रकरणी लिखित स्वरुपात आपले मत मांडावे, पण याबाबत मी अद्याप शिंदे व शाह यांच्यासह चर्चा केलेली नाही.’
गौतमच्या या वर्तनानंतर निवड समिती खूप नाराज असून येत्या काळात राष्ट्रीय संघात जागा मिळवणे
या खेळाडूसाठी खूप कठीण असेल, अशी माहितीही मिळाली आहे.